हांगझोउ (चीन) Asian Games2023/ Asian Games2022 : आशियाई स्पर्धा २०२३च्या दुसऱ्या दिवसाची भारतीयांनी सुवर्ण सुरुवात केली. नेमबाजांनी १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केल्यानंतर नौकानयन क्रीडा प्रकारात दोन कांस्यपदकं भारतीय खेळाडूंनी जिंकली. त्यापाठोपाठ नेमबाजीत आणखी दोन पदकं भारताने जिंकली. १० मीटर एअर रायफल वैयक्तिक गटात ऐश्वर्यने कांस्य जिंकल्यानंतर २५मीटर रॅपिड फायर पिस्तुल सांघिक गटाक कांस्यपदक जिंकले. भारताने आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये पहिले सुवर्ण जिंकल्याने चीनमध्ये भारताचे राष्ट्रगीत वाजले अन् हा व्हिडीओ पाहून सर्वांना अभिमान वाटला.
शेतकऱ्याच्या पोरानं पदक जिंकलं! ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने फायनलमध्ये रुद्रांक्ष पाटीलला नमवलं
दिव्यांश सिंग पनवार, रुद्रांक्ष पाटील आणि ऐश्वर्य तोमर या नेमबाजांनी भारताला पहिले सुवर्णपद जिंकून दिले. त्यांनी १८९३.७ गुणांची कमाई करताना वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. वैयक्तिक गटात ऐश्वर्यने कांस्यपदकाची कमाई केली. वैयक्तिक गटात ऐश्वर्य व रुद्रांक्ष यांनी दमदार खेळ करताना समान २०८.७ गुण पटकावले आणि त्यांच्यात शूट आऊट झालं. त्यात रुद्रांक्षला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यानंतर २२८.८ गुणांसह ऐश्वर्यने कांस्यपदक निश्चित केले. त्यानंतर २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल गटात आदर्श सिंग, अनिष व विजयवीर सिधू यांनी १७१८ गुणांसह कांस्यपदक निश्चित केले. सुवर्णपदक विजेत्या चीनपेक्षा भारताला ४७ गुण कमी मिळाले. विजयवीरने ५८२ गुणांसह वैयक्तिक गटाची फायनल गाठली.
- - नौकानयन पुरूष सांघिक गटात ( Rowing Men's Four) जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनित कुमार आणि आशिष यांनी भारताला कांस्यपदक जिंकून दिले. भारत ६:१०.८१ मिनिटांच्या वेळेसह तिसरा आला.
- नौकानयनपटूंनी Men's Quadruple Sculls सांघिक गटात कांस्यपदक जिंकले. २०१८च्या विजेत्या भारतीय संघाला ६:०८.६१ मिनिटाच्या वेळेसह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
- टेनिसपटू अंकिता रैनाने महिलांच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना उझबेकिस्तानच्या सर्बिना ओलिमजोनोव्हाचा ६-०,६-० असा सहज पराभव केला.
- जलतरणात १०० मीटर ब्रिस्टस्ट्रोक प्रकारात लिकिथ सेल्वराजने १:०१.९८ मिनिटांच्या वेळेसह आठव्या स्थानासह फायनलमध्ये प्रवेश पक्का केला.
- ज्युदोपटू गरिमा चौधरीला फिलिपाईन्सच्या रोक्यो सॅलिनासकडून ६० किलो वजनी गटाच्या उप उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला.
- जलतरणात पुरुषांच्या ४ बाय २०० मीटर फ्रीस्टाईल रिले प्रकारात भारताची फायनलमध्ये धडक, कुशाग्र, तनिष, अनीष आणि आर्यन यांनी ७:२९.०४ मिनिटांची नोंदवली वेळ