अर्जुन पुरस्कार विजेत्या स्वप्ना बर्मन हिच्या जलपाईगुडी येथील घरावर वन विभागानं छापा टाकला. तिने घरी अनधिकृतपणे लाकडांचा साठा केल्यामुळे वन विभागानं ही धाड टाकली. त्यानंतर राज्य सरकारने वन अधिकाऱ्याची बदली केली, परंतु स्थानिकांनी राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलन केले आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वप्ना बर्मन हिला क्लीनचीट दिली आहे. राज्य सरकारने वन अधिकारी संजय दत्ता यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. संजय दत्ता हे बैकुंठापूर वन विभागातील बेलाकोबा येथील अधिकारी होते. राज्य सरकारच्या या निर्णयाला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे आणि दत्ता यांच्या बदलीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली जात आहे.
दत्ता आणि त्यांच्या टीमने १३ जुलैला स्वप्ना बर्मनच्या घरी छापा टाकला आणि त्यांना तिच्या घरी अनधिकृतपणे लाकडांचा साठा केलेला सापडला, अशी माहिती सूत्रांनी दिली. ही लाकडं खरेदी केल्याची कोणतीही पावती बर्मनकडे नव्हती, असेही सूत्रांनी सांगितले.
ममता बॅनर्जी म्हणाल्या," घराचं काम करण्यासाठी स्वप्नानं ही लाकडं खरेदी केली होती. राजबंशी समुदायातील ती एक चांगली खेळाडू आहे. मी तिचा आदर करते. राज्य सरकारला कोणतीही कल्पना न देता काही वन अधिकाऱ्यांनी हा छापा टाकला. त्यांनी आम्हाला विचारले असते, तर त्यांना परवानगी दिली नसती."
स्वप्नाने २०१८ च्या आशियाई स्पर्धेत हेप्टाथ्लॉनमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. बॅनर्जी यांनी बर्मनशी फोनवर चर्चा केली.