Asian Hockey Champions Trophy : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने विजयी चौका मारला. गुरुवारी झालेल्या लढतीत भारतीयहॉकी संघाने दक्षिण कोरियाला ३-१ असे पराभूत करत सलग चौथ्या विजयाची नोंद केली. सलद दोन वेळा कांस्य पदकासह ऑलिम्पिक चॅम्पियन ठरलेल्या भारतीय हॉकी संघ कमालीच्या आत्मविश्वासानं खेळताना दिसतोय. गत हंगामाप्रमाणे यावेळीही पुन्हा आशियाई चॅम्पियन होण्याच्या दिशेनं संघाचा प्रवास सुरु आहे.
सरपंचजी अर्थात कॅप्टनसह अरजीत सिंग हुंडलनं डागला गोल
भारताकडून अरिजीत सिंग हुंडल याने एक तर कर्णधार हरमनप्रीत सिंग याने २ गोल डागले. हरमनप्रीत याने मारलेल्या दोन्ही गोलला पेनल्टी कॉर्नरचा आधार होता. दुसरीकडे अरिजीतने फिल्ड गोलसह प्रतिस्पर्धी संघाला बॅकफूटवर टाकले. या दोघांच्या गोलमुळे भारतीय संघाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती. जी शेवटपर्यंत कायम राहिली.
भारतायी आशायई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील कामगिरी
यजमान चीन विरुद्धच्या लढतीत भारतीय संघाने ३-० असा विजय नोंदवत विजयी सलामी दिली होती. दुसऱ्या लढतीत भारतीय हॉकी संघाने जपानच्या संघाला ५-१ अशा फरकाने पराभूत केले होते. मलेशियाचा संघ तर भारतीय संघासमोर सपशेल अपयशी ठरला. त्यांनी एक गोल डागला पण ८ गोल खाल्ले. भारताचा या स्पर्धेतील हा मोठा विजय ठरला.
राउंड रॉबिन फेरीतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघासमोर असेल पाकिस्तानचा संघ
आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी सहा संघ मैदानात उतरले आहेत. राउंड रॉबिन पद्धतीनुसार प्रत्येक संघ एकमेकांसोबत एक सामना खेळणार आहे. भारतीय संघ राउंड रॉबिन फेरीतील आपला अखेरचा सामना पाकिस्तान विरुद्ध खेळताना दिसेल. दोन्ही संघ मैदानात उतरले की, माहोल एकदम खास असतो. या सामन्यातही तेच चित्र पाहायला मिळेल. १४ सप्टेंबरला भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना पाहायला मिळणार आहे.