मुंबई- आशियाई स्पर्धेचे सुवर्णपदक दाखवून वडिलांकडून पाठीवर कौतुकाची थाप मारून घेण्याचे तेजिंदरपाल सिंग तूरचे स्वप्न अधुरे राहिले. जकार्ता येथून मायदेशी परतल्यावर विमानतळावरच वडिलांच्या जाण्याची वार्ता त्याला मिळाली आणि सुवर्ण जिंकल्याचा आनंद क्षणात विरला. जकार्ता येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तेजिंदरने गोळाफेकीत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. कँसरशी झगडणाऱ्या त्याच्या वडिलांचे सोमवारी मध्यरात्री निधन झाले. (Asian Games 2018: वडिलांचा कँसरशी संघर्ष, मुलानं लिहिला सुवर्ण इतिहास!)
( Asian Games 2018 : गोळाफेकीत भारताला सुवर्णपदक, तेजींदरपालचा विक्रम )
शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या तेजींदरने वडिलांखातर गोळाफेक खेळाची निवड केली. आशियाई स्पर्धेचे सराव शिबीर पतियाळा येथे भरलेले होते. त्यावेळी तो सरावाचे वेळापत्रक सांभाळून लुधियानाला आपल्या वडिलांना भेटण्यासाठी जायचा. काही काळ त्याचा परिणाम त्याच्या प्रकृतीवरही झाला होता. मात्र, प्रशिक्षकांनी समजावल्यानंतर त्याने सरावावर लक्ष केंद्रित केले. तेजिंदरच्या वडिलांच्या जाण्याचा क्रीडा वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर त्यांना आदरांजली वाहिली जात आहे.