दोहा : भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी रविवारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पुन्हा समोरासमोर येणार आहे. मात्र, या सामन्याच्या पुर्वसंध्येला भारतालापाकिस्तानकडून हार मानावी लागली. आशियाई सांघिक स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानने 3-2 अशा फरकाने भारताचा पराभव केला. बाबर मासिहने 81 गुणांचा ब्रेकसह पहिल्या सामन्यात पंकज अडवाणीवर 110(81)-2 असा विजय मिळवला. मात्र, मलकित सिंगने दुसऱ्या सामन्यात मोहम्मद आसिफला 81(52)-47 असे नमवत सामना 1-1 अशा बरोबरीत आणला. दुहेरीत आसिफ आणि मासिह यांनी चुरशीच्या सामन्यात 72-70 असा निसटता विजय मिळवून पुन्हा आघाडी घेतली. एकेरीच्या परतीच्या लढतीत पंकजने 107(68)-5 अशा फरकाने आसिफला सहज नमवले.
त्यामुळे 2-2 अशा बरोबरीनंतर सामना निर्णायक फ्रेममध्ये गेला. त्या मलकितला मासिहकडून 18-98 अशी हार मानावी लागली आणि भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.