नवी दिल्ली : सांघिक गटात आवश्यक असलेले खेळाडू न उतरविल्याचा फटका भारतीय धावपटूंना बसला आहे. बहरिनमध्ये झालेल्या आशियाई क्रॉसकंट्रीत भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनने (एएफआय) मोजके खेळाडू पाठविल्यामुळे संघाला तीन कांस्यपदकांपासून वंचित राहावे लागले.एएफआयने चॅम्पियनशिपमध्ये सिनियर पुरुष व महिला तसेच ज्युनियर पुरुष व महिला गटात प्रत्येकी ३ खेळाडू पाठविले होते. वरिष्ठ पुरुष वगळता अन्य तीन गटांत भारतीय खेळाडूंना किमान तीन कांस्यपदकांची संधी होती, कारण सर्वाधिक गुण भारतीयांनी मिळविले होते. मनामा येथे झालेल्या या स्पर्धेत भारताची पदकांची झोळी रिकामीच राहिली. प्रत्येक देशाला एका गटासाठी किमान चार खेळाडू पाठविता येतात. पहिल्या तीन स्थानांवर राहणाऱ्या खेळाडूंना गुण दिले जातात. अव्वल स्थानासाठी एक, दुसऱ्या स्थानासाठी दोन व तिसऱ्या स्थानासाठी तीन गुण असतात. सर्वांत कमी गुण मिळविणाऱ्या संघाला सुवर्णपदक दिले जाते.याबाबत विचारणा करताच एएफआय अध्यक्ष आदील सुमारीवाला यांनी मुख्य संचालन अधिकारी मनीष कुमार यांच्यासोबत बैठक सुरू असल्याचे सांगितले. निकालावरून भारताला किमान तीन पदके मिळायला हवी होती, इतकेच ते म्हणाले. पदके का मिळाली नाहीत, याचे उत्तर नंतर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सिनियर महिला गटात बहरिन अव्वल स्थानावर राहिला. भारताची संजीवनी जाधव, स्वाती गाढवे आणि मनीषा साळुंखे सातव्या, दहाव्या व १७व्या स्थानी आल्या. भारतीय संघाचे ३४ गुण झाले. बहरिन व चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या स्थानावर आल्याने एक कांस्य मिळायला हवे होते. ज्युनियर पुरुष गटात बहरिन सुवर्णाचा मानकरी ठरला, तर जपानला रौप्य मिळाले. भारताने किसन तडवी, अन्सार इमान दर्गीवाले व अनिल यादव आठव्या, दहाव्या व ११व्या स्थानावर आले. भारताचे ४९ गुण झाल्याने कांस्य घोषित करण्यात आले होते. ज्युनियर महिला गटातही बहरिन ८ गुणांसह अव्वल, तर जपान दुसऱ्या स्थानावर राहिला. भारतीय धावपटू आरती दत्तारे, नंदिनी गुप्ता आणि सुधा पाल या ११व्या, १२व्या व १६व्या स्थानावर आल्या. भारताचे ३९ गुण झाले होते; पण ४ खेळाडूंसह उतरलेल्या जॉर्डनला ५० गुणांची कमाई केल्यानंतरही कांस्यपदक देण्यात आले. (वृत्तसंस्था)
धावपटू तीन पदकांना मुकले
By admin | Published: March 01, 2016 3:03 AM