World Athletics Championships, Annu Rani : उत्तर प्रदेशच्या बहादूरपूर गावातील २९ वर्षीय अनु राणीने जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत गुरुवारी ऐतिहासिक कामगिरी केली. २८ ऑगस्ट १९९२मध्ये शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अनुला तिचा भाऊ उपेंद्र याने भालाफेकीचे प्रशिक्षण दिले. सुरुवातीला तिला ऊसाचा बांबू फेकण्यास लावून ट्रेनिंग दिली. भाला खरेदी करण्याइतके पैसेही या कुटुंबाकडे नसल्याने अनु बांबूलाच भाला समजून सराव करायची. वयाच्या १८व्या वर्षी तिने भालाफेकीला सुरुवात केली. वडिलांचा तीव्र विरोध झुगारून भाऊ तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. २०१४मध्ये तिने प्रथम राष्ट्रीय विक्रम मोडला आणि त्यानंतर ८ वेळा राष्ट्रीय विक्रम स्वतःच्या नावावर केले. आज त्याच अनुने जागतिक स्पर्धेत कमाल करून दाखवली.
India at World Athletics Championships: अनु राणीने महिलांच्या भालाफेकीच्या पात्रता स्पर्धेत ५९.६० मीटर लांब भालाफेकून अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. पहिल्या दोन प्रयत्नांत अपयश आल्यानंतर अनुने तिसऱ्या प्रयत्नात जोर लावला अन् अंतिम फेरीतील जागा पक्की केली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या भालाफेक प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे. गत जागतिक स्पर्धेतही तिने अंतिम फेरीत प्रवेश केला होता.