रिओ : आॅलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू गुरुवारी (दि. ११) आपल्या अभियानाची सुरुवात करणार आहेत. या स्पर्धेत लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदकविजेत्या सायना नेहवालसह अनुभवी ज्वाला गुट्टा, आश्विनी पोनप्पा, पी. व्ही. सिंधू, के. श्रीकांत या खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष आहे. सायना सध्या बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे. तिने लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्य जिंकण्यापूर्वी बीजिंग आॅलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. आता रिओत तिच्याकडून पदकाची अपेक्षा आहे. रिओतील गु्रप जीमध्ये सायनाला पहिल्या लढतीत लोहायिन विन्सेंटशी, तर उपउपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना थायलंडच्या पोनटीपशी होऊ शकतो, तर उपांत्यपूर्व सामन्यात तिला चीनच्या जुईरुईविरुद्ध खेळावे लागू शकते. अन्य भारतीय खेळाडूंमध्ये दोन वेळा जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदकविजेत्या पी. व्ही. सिंधूच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष आहे. आॅलिम्पिकमध्ये पदार्पण करणाऱ्या सिंधू ग्रुप एममध्ये तिच्यासमोर हंगेरीची सरोसी लॉरा आणि कॅनडाची मिशेल ली यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. पुरुष एकेरीत के. श्रीकांतकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. त्याच्यासमोर ली चोंग वेई, चेन लोंग, लीन डॅन यांसारख्या अनुभवी खेळाडूंचे आव्हान आहे. महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा व आश्विनी पोनप्पा, तसेच पुरुष दुहेरीत मनू अत्री व बी. सुमीत रेड्डीला उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल.
सायनाकडे लक्ष
By admin | Published: August 11, 2016 12:52 AM