जकार्ता : सायना नेहवाल उद्या इंडोनेशिया ओपन सुपर सिरीजमध्ये सुरुवात करणार असून, या भारतीय स्टार खेळाडूचे लक्ष आॅलिम्पिकआधी आपला आत्मविश्वास उंचाविण्यासाठी हंगामातील पहिले विजेतेपद पटकाविण्याकडे असणार आहे.सायनाला दुखापतीमुळे काही स्पर्धांत खेळता आले नव्हते; परंतु आता ती दुखापतीतून पूर्ण सावरली आहे. त्यानंतर तिने इंडिया ओपन, मलेशिया ओपन आणि आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत उपांत्य फेरीही गाठली. भारतीय संघाच्या उबेर चषकात कांस्यपदकाच्या कामगिरीदरम्यान सायनाने साखळीतील सर्वच सामने जिंकले; परंतु तिला बाद फेरीत थायलंडच्या रतचानोक इंतानोन आणि चीनच्या ली जुरेई यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.सायनाने २00९, २0१0 आणि २0१२ मध्ये इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकाविले होते. तिचा प्रयत्न हा अव्वल खेळाडूंविरुद्ध कामगिरी उंचावून विजेतेपद पटकाविण्याकडे असेल. उद्या स्पर्धेच्या पात्रता फेरीस प्रारंभ होणार आहे आणि सायना मंगळवारी चिनी ताइपेच्या पाई यू पो हिच्याविरुद्ध पहिल्या फेरीत खेळणार आहे. तथापि, या स्पर्धेत पी. व्ही. सिंधूने सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यातील व्यस्त वेळापत्रकानंतर ती सध्या ट्रेनिंग करीत आहे. पुरुष एकेरीतदेखील श्रीकांत आणि अजय जयराम यांनी स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे, तर पी. कश्यप दुखापतीवर सर्जरी केल्यानंतर फिजिओथेरपी करीत आहे. एच.एस. प्रणय पाय आणि अंगठ्याच्या दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळणार नाही. क्वॉलिफायर बी. साई प्रणीत आणि आरएम गुरुसाईदत्तदेखील खेळणार नाही. (वृत्तसंस्था)राष्ट्रीय चॅम्पियन समीर वर्मा हा स्पर्धेत सहभागी होणारा एकमेव भारतीय असेल. रिओ आॅलिम्पिकमध्ये जाणाऱ्या बॅडमिंटन खेळाडूंत २0१0 राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकप्राप्त खेळाडू ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा ही जोडी इंडोनेशियाच्या फॅब्रियाना द्विपुजी कुसुमा आणि रिबका सुगियार्तो या जोडीविरुद्ध दोन हात करेल, तर मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी यांचा सामना पुरुष दुहेरीत फिलिपाइन्सच्या पीटर गॅब्रियल मॅगनाये आणि एलविन मोराडा या जोडीविरुद्ध होईल.
सायनाचे विजेतेपदाकडे लक्ष
By admin | Published: May 30, 2016 2:57 AM