मुंबई: विवो प्रो कबड्डी लीगच्या (PKL) नवव्या हंगामाला लवकरच सुरूवात होणार आहे. या लीगसाठी मुंबईत खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेचे आयोजन करण्यात येणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे यावर्षी तब्बल ५०० हून अधिक खेळाडू लिलावात सहभागी होणार आहेत. नवव्या हंगामासाठी खेळाडूंचा होणारा लिलाव ५ ते ६ ऑगस्टदरम्यान मुंबईत पार पडेल. या लिलावात विदेशी खेळाडूंसह भारतातील युवा खेळाडूंना चार श्रेणींमध्ये विभागले जाईल. ए, बी, सी, डी या श्रेणींमध्ये अष्टपैलू (Allrounder), बचावपटू (Defender) आणि चढाईपटू (Raider) यानुसार खेळाडूंना विभागले जाईल.
दरम्यान, श्रेणी ए - ३० लाख, श्रेणी बी - २० लाख, श्रेणी सी - १० लाख आणि श्रेणी डी - ६ लाख या प्रत्येक श्रेणीसाठी किमती ठरवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे नवव्या हंगामासाठी प्रत्येक फ्रँचायझीकडे एकूण ४.४ कोटी रूपये असणार आहेत. लीगमधील धोरणांनुसार प्रो कबड्डी लीगमधील संघाना त्यांच्या आठव्या हंगामातील खेळाडूंना कायम ठेवण्याचा पर्याय आहे. फ्रँचायझींना प्रत्येक PKL हंगामात ठरलेल्या अटींनुसार एलिट रिटेन्ड प्लेअर्स श्रेणी अंतर्गत ६ खेळाडू आणि ४ नवीन युवा खेळाडू कायम ठेवता येणार आहेत. कबड्डीची ही बहुचर्चित लीग लवकरच आपल्या नवव्या हंगामात पदार्पण करणार आहे.
पाटणा पायरेट्सच्या संघाचे वर्चस्व प्रो कबड्डीच्या इतिहास सर्वाधिक ३ वेळा जेतेपद पटकावणारा पाटणा पायरेट्सचा एकमेव संघ आहे. संघाने तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या हंगामात सलग तीन वेळा जेतेपद पटकावून विजयाची हॅट्रिक लगावली होती. मात्र गतवर्षी संघाला अंतिम फेरीत दबंग दिल्लीकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे लवकरच संघाचे मुख्य प्रशिक्षक आपल्या संघातील खेळाडूंची रिटेंशन लिस्ट जारी करण्याची शक्यता आहे. प्रो कबड्डीच्या नवव्या हंगामाची सुरूवात ऑक्टोबर पासून होण्याची दाट शक्यता आहे.