पटाया : भारताची प्रतिभावान युवा खेळाडू तेजस्विनी सागर हिने भीमपराक्रम करताना गुरुवारी येथे संपलेल्या जागतिक शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत १५ वर्षांखालील गटात सुवर्णपदक जिंकताना ‘वर्ल्ड चॅम्पियन’चा बहुमान मिळविला. तेजस्विनी सागर हिचे हे पहिले जगज्जेतेपद आहे.औरंगाबादच्या तेजस्विनी सागर हिने श्रीलंकेच्या काविन्या मियुनी राजपक्षे हिचा नवव्या आणि अखेरच्या फेरीत पराभव करताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तेजस्विनीला काल रात्री आघाडी घेणारी रशियाची इरिना बारबायेव्हा ही अखेरच्या फेरीत कजाकिस्तानच्या अलीसा कोजीबायेव्हा हिच्याकडून पराभूत झाल्याचा फायदा झाला.९ फेऱ्यांच्या या स्पर्धेत तेजस्विनीने सहा लढती जिंकल्या. तसेच, तिने दोन फेऱ्या बरोबरीत सोडवल्या आणि एका फेरीत तिला पराभवाचा सामना करावा लागला. याआधी नागपूर येथील राज्यस्तरीय महिलांच्या बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या तेजस्विनीने श्रीलंकेच्या विक्रमासिंघे दिलहरा इशिनी हिचा ३१ चालीत पराभव करताना विजयी प्रारंभ केला होता.आई अंजली सागर (पलांडे) यादेखील राष्ट्रीय बुद्धिबळपटू असल्यामुळे तिला बालपणापासूनच बुद्धिबळाचे धडे मिळणाऱ्या तेजस्विनीने याआधी २00८ मध्ये तेहरान येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. तसेच, २00८ मध्ये नागपूर येथील कॉमनवेल्थ स्पर्धेत रौप्य. त्यानंतर तिच्यासाठी २0१0 हे वर्ष खूपच फलदायी ठरले. या वर्षी तिने चीन आणि दिल्ली येथील कॉमनवेल्थ स्पर्धेत कांस्य, ११ व्या सिंगापूर ओपन स्पर्धेत सुवर्ण, श्रीलंकन वूमन्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
औरंगाबादची तेजस्विनी बनली ‘वर्ल्ड चॅम्पियन’
By admin | Published: May 15, 2015 1:01 AM