विश्व चॅम्पियन आॅस्ट्रेलियाने एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत सोमवारी आॅलिम्पिक चॅम्पियन जर्मनीचा ४-३ ने पराभव करीत स्पर्धेत दुसरा विजय नोंदवला. अन्य लढतीत ब्रिटनने कोरियाचा ४-१ ने पराभव केला. आॅस्ट्रेलियाला सलामी लढतीत ब्रिटनविरुद्ध गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर आॅस्ट्रेलियाने कोरियाचा ४-२ ने पराभव केला होता. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या आॅस्ट्रेलिया आणि क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या जर्मनी संघांदम्यानची लढत रंगतदार झाली. सामन्यात ४० व्या मिनिटापर्यंत उभय संघ ३-३ ने बरोबरीत होते. ५३ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर अरान जालेवस्कीने गोल नोंदवत आॅस्ट्रेलियाला ४-३ ने आघाडी मिळवून दिली व विजय निश्चित केला. आॅस्ट्रेलिया संघ ७ गुणांसह गुणतालिकेत आघाडीवर आहे, तर तीन सामने खेळणाऱ्या जर्मनी संघाच्या खात्यावर केवळ दोन गुणांची नोंद आहे. जर्मनीतर्फे फ्लोरियन फुक्स (१२ वा मिनिट) आणि टोबायस हॉक (१४ वा मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती, पण आॅस्ट्रेलियातर्फे ग्लेन टर्नर (१७ वा मिनिट) आणि ट्रिस्टान व्हाईट (२२ वा मिनिट) यांनी मैदानी गोल नोंदवत संघाला २-२ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर फुक्सने गोल नोंदवत जर्मनीला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली, तर ब्लॅक गोव्हर्सने ४० व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवत आॅस्ट्रेलियाला बरोबरी साधून दिली. जालेवस्कीने ५३ व्या मिनिटाला आॅस्ट्रेलियातर्फे विजयी गोल नोंदवत जर्मनीला स्पर्धेत पहिला पराभव स्वीकारण्यास भाग पाडले. जर्मनीला पहिल्या दोन्ही सामन्यांत भारत व बेल्जियमविरुद्ध बरोबरीत समाधान मानावे लागले आहे. ब्रिटनने कोरियाचा ४-१ ने पराभव करीत स्पर्धेत पहिला विजय नोंदवला. ब्रिटनच्या विजयात अॅश्ले जॅक्सन (१२ वा मिनिट), डेव्हिड कोंडोन (१८ व ४६ वा मिनिट) आणि अॅलिस्टेयर ब्रागडोन (३३ वा मिनिट) यांनी गोल नोंदविले. कोरियातर्फे एकमेव गोल सियुनग्यूने २२ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर केला. कोरियाचा तीन सामन्यांतील हा दुसरा पराभव आहे.
आॅस्ट्रेलियाचा जर्मनीवर ४-३ ने रोमांचक विजय
By admin | Published: June 14, 2016 4:00 AM