ऑनलाइन लोकमत
ब्रिस्बेन, दि. २० - भारताविरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्यातील १२८ धावांचे आव्हान सहज पार करून ऑस्ट्रेलियाने भारतावर चार गडी राखून विजय मिळवला. ख्रिस रॉजर्सने सर्वाधिक (५५) धावा करत ऑस्ट्रेलियाचा विजयाचा मार्ग मोकळा केला. मात्र ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अवघ्या ६ धावांची गरज असताना भारतीय गोलंदाजांनी त्यांचे आणखी तीन गडी बाद करत त्यांना कडवी टक्कर देण्याचा प्रयत्न केला, मात्र जिंकण्यासाठी अतिशय कमी धावांचे लक्ष्य दिल्याने गोलंदाजांचे प्रयत्न वाया गेले. इशांत शर्माने ३ तर यादवने २ बळी टिपले. कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावणा-या स्टीव्ह स्मिथला 'मॅन ऑफ दि मॅच'चा पुरस्कार देण्यात आला.
तत्पूर्वी भारतीय फलंदाजांनी दुस-या डावात केलेल्या हाराकिरीमुळे भारताचा धाव २२४ धावांवर आटोपला आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी अवघ्या १२८ धावांचे आव्हान ठेवले. शिखर धवन ८१ व चेतेश्वर पुजारा ४१ धावा वगळता एकाही फलंदाजाने चांगली फलंदाजी केली नाही आणि भारताला पराभवाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले.
स्टिव्हन स्मिथचे सलग दुसरे शतक आणि तळाच्या फलंदाजांनी दिलेल्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध दुस-या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ९७ धावांची आघाडी घेतली होती. कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकाविणारा स्मिथ नववा खेळाडू ठरला. ६ बाद २४७ अशी अवस्था असताना यजमान संघाने पहिल्या डावात ५०५ धावांची मजल मारली. स्मिथने १३३, तर जॉन्सनने ९३ चेंडूंमध्ये ८८ धावा फटकाविल्या. मिशेल स्टार्कने ५२ धावांचे योगदान दिले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी पाहुणा भारतीय संघ २६ धावांनी पिछाडीवर होता. त्यावेळी शिखर धवन (२६) आणि चेतेश्वर पुजारा (१५) खेळपट्टीवर होते. पहिल्या डावात ९७ धावांनी पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने शुक्रवारी तिस-या दिवसअखेर दुस-या डावात १ बाद ७१ धावांची मजल मारली.
भारतासाठी या लढतीचा तिसरा दिवस निराशाजनक ठरला. ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या चार फलंदाजांनी २५८ धावांची भर घातली. कालच्या ४ बाद २२१ धावासंख्येवरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाने ११ धावांची भर घातली असता मिशेल मार्श (११) माघारी परतला. त्याला ईशांत शर्माने तंबूचा मार्ग दाखविला. दुसऱ्या टोकाकडून मात्र स्मिथने संयमी फलंदाजी केली. ब्रॅड हॅडिन (६) ला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. अॅरोनच्या उसळत्या चेंडूवर त्याचा उडालेला झेल चेतेश्वर पुजाराने टिपला. त्यानंतर स्मिथने जॉन्सनच्या साथीने डाव सावरला. जॉन्सनने ईशांत व अॅरोनच्या गोलंदाजीवर १९ चेंडूंमध्ये ३७ धावा वसूल केल्या. याव्यतिरिक्त यादवच्या गोलंदाजीवर १८ चेंडूंमध्ये १८ धावा फटकाविल्या. स्मिथने १९१ चेंडूंना सामोरे जाताना १३ चौकार व २ षटकारांच्या सहायाने १३३ धावा फटकाविल्या.
स्मिथचे या मालिकेतील हे दुसरे शतक आहे. अॅडिलेड कसोटी सामन्यात त्याने नाबाद १६२ धावांची खेळी केली होती. स्मिथने चौथ्या विकेटसाठी शॉन मार्शसोबत ८७ धावांची, तर सातव्या विकेटसाठी जॉन्सनसोबत १४८ धावांची भागीदारी केली. आठव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या जॉन्सनने ९३ चेंडूंमध्ये १३ चौकार व १ षटकारांसह ८८ धावा फटकाविल्या. नवव्या क्रमांकावरील स्टार्कनेही अर्धशतकी खेळी केली. स्टार्कने ५९ चेंडूंमध्ये ६ चौकार ठोकले. नॅथन लियोन (२३) व स्टार्क यांनी नवव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. स्टार्कचे हे कसोटी क्रिकेटमधील चौथे अर्धशतक ठरले. या व्यतिरिक्त भारताच्या डावात ५ बळी घेणाऱ्या जोश हेजलवूडने नाबाद ३२ धावांचे योगदान दिले. भारतातर्फे ईशांत शर्मा व उमेश यादव यांनी प्रत्येक ३ बळी घेतले.
धवन व विजय यांनी भारताला दुसऱ्या डावात आक्रमक सुरुवात करून दिली. पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या विजयला (२७) स्टार्कने माघारी परतवत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर धवन व पुजारा यांनी संयमी खेळ केला. (वृत्तसंस्था)
जॉन्सनचे वादळ रोखण्यास भारतीय गोलंदाज अपयशी : स्टिव्ह स्मिथ
> कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना पहिल्या सामन्यात शतक झळकाविणाऱ्या स्टिव्हन स्मिथने या शतकी खेळीपेक्षा मिशेल जॉन्सनच्या ८८ धावांच्या खेळीला अधिक महत्त्व दिले. जॉन्सनला रोखण्यात भारतीय गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. जॉन्सनच्या आक्रमक खेळीला भारतीय गोलंदाजांकडे उत्तर नव्हते, अशी प्रतिक्रिया स्टिव्हन स्मिथने व्यक्त केली.
> तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना स्मिथ म्हणाला,‘जॉन्सनने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा स्वीकारला. जॉन्सन नेहमी याच शैलीत खेळतो. भारतीय गोलंदाजांनी त्याच्याविरुद्ध आक्रमक धोरण अवलंबविण्याचा प्रयत्न केला आणि आखूड टप्प्यांचा मारा केला. नेमकी हिच बाब जॉन्सनच्या पथ्यावर पडली.’
> स्मिथ म्हणाला,‘जॉन्सनने ‘जशास तशे’ धोरण अवलंबिले. जॉन्सनच्या फटक्यांचे भारतीय गोलंदाजांकडे उत्तर नव्हते. त्याने भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. मोठी भागीदारी करण्यास आम्ही प्रयत्नशील होतो आणि आम्ही त्यात यशस्वी ठरलो. तळाच्या फलंदाजांनी उल्लेखनीय योगदान दिल्यामुळे आम्हाला वर्चस्व मिळविता आले.’
> शतकी खेळीबाबत बोलताना स्मिथ म्हणाला, ‘शतकी खेळी केल्यामुळे निश्चितच आनंद झाला.’ कर्णधार म्हणून पहिल्या कसोटीत शतक झळकाविणारा स्मिथ नववा खेळाडू ठरला आहे. १९७८मध्ये ग्रॅहम येलपने शतक केल्यानंतर अशी कामगिरी करणारा स्मिथ आॅस्ट्रेलियाचा पहिला खेळाडू ठरला आहे.