ऑनलाइन लोकमत
सेंट किट्स, दि. १२ - सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या संयमी १५७ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर आणि गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर ३६ धावांनी विजय मिळविला. सेंट किट्समधील मैदानावर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २८८ धावा केल्या होत्या. या आव्हानापुढे दक्षिण आफ्रिकेची स्थिती एकवेळ ३ बाद २१० अशी होती. मात्र, त्यानंतर अवघ्या ४२ धावांतच त्यांचे बाकीचे खेळाडू बाद झाल्याने आफ्रिकेचा डाव २५२ धावांत संपुष्टात आला आणि त्यांना ३६ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
वॉर्नरने मायदेशाबाहेर एकदिवसीय सामन्यांत झळकाविलेले हे पहिलेच शतक होते. त्याला उस्मान ख्वाजा आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी अर्धशतके झळकावून चांगली साथ दिली. स्मिथने अखेरपर्यंत मैदानात थांबत केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने २८८ धावांपर्यंत मजल मारली. क्विटॉन डी कॉक बाद झाल्यानंतर फाफ डू प्लेसिस आणि हाशिम आमला यांनी अर्धशतके ठोकत आफ्रिकेला विजयाकडे नेले. मात्र, हे दोघे बाद झाल्यानंतर ड्युमिनी आणि डिव्हिलर्स यांना डाव संभाळण्याचा प्रयत्न केला. डिव्हिलर्स ३९ धावांवर बाद झाल्यानंतर आफ्रिकेचे उर्वरित फलंदाज अवघ्या ४२ धावांत बाद झाले. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवुड, मिशेल स्टार्क आणि ऍडम झम्पा यांनी प्रत्येकी तीन बळी मिळविले.