बर्गिंहॅम : सध्या जगभर राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ (CWG 2022) ची खूप चर्चा रंगली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत यंदा देखील ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेने अवघ्या क्रीडा विश्वाला आपलेसे केले आहे. मात्र यजमान देशातील खेळाडूंनाही मागे टाकत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आपला विजयरथ कायम ठेवला आहे. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेतील यंदाच्या हंगामात आतापर्यंत सर्वाधिक १०६ पदके जिंकली आहेत. तसेच यंदाच्या हंगामात पदकांचे शतक ठोकणारा ऑस्ट्रेलिया पहिला देश ठरला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे वर्चस्व राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आतापर्यंत सर्वाधिक ४२ सुवर्णपदक पटकावली आहेत. एवढेच नाही तर कांस्य पदक जिंकण्याच्या बाबतीत देखीला कांगारूचा देश अव्वल स्थानावर विराजमान आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत एकूण ३२ कांस्यपदक जिंकली आहेत. तर रौप्य पदकाच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर असून देशाने आतापर्यंत एकूण ३२ रौप्य पदक मिळवली आहेत.
दरम्यान, राष्ट्रकुल स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक पदक जिंकण्याच्या यादीत यजमान इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर स्थित आहे. इंग्लिश खेळाडूंनी आतापर्यंत ३१ सुवर्ण, ३४ रौप्य आणि २१ कांस्य यांसह एकूण ८६ पदक पटकावली आहेत. तर पदक जिंकण्याच्या बाबतीत न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे, न्यूझीलंडने या हंगामात आतापर्यंत २६ पदकांवर आपले नाव कोरले आहे. यामध्ये १३ सुवर्ण, सात रौप्य आणि सहा कांस्य पदकांचा समावेश आहे.
भारत सहाव्या क्रमांकावर भारतीय खेळाडूंनी देखील आपली प्रतिभा दाखवत इंग्लंडच्या भूमीवर तिरंगा फडकावला आहे. भारताने आतापर्यंत एकूण १३ पदक जिंकली आहेत. लक्षणीय बाब म्हणजे सर्वाधिक पदक जिंकण्याच्या यादीत भारत सध्या सहाव्या क्रमांकावर स्थित आहे. भारताच्या खात्यात पाच सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कांस्य पदकांची नोंद आहे. भारताला आतापर्यंत वेटलिफ्टिंगमधून सर्वाधिक सात पदक मिळाली आहेत. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील संकेत सरगरने भारतासाठी रौप्य पदक जिंकून पदकाचे खाते उघडले होते.