पर्थ : अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने फलंदाजी व गोलंदाजीमध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करीत आॅस्ट्रेलियाला तिरंगी वन-डे सामन्यांच्या मालिकेत जेतेपदाचा मान मिळवून दिला. मॅक्सवेलच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने आज, रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत इंग्लंडचा ११२ धावांनी पराभव केला.आॅस्ट्रेलियाने मॅक्सवेलच्या (९५) खेळीच्या जोरावर ८ बाद २७८ धावांची मजल मारली. सुरुवातीला यजमान संघाची ४ बाद ६० अशी अवस्था झाली होती. त्यानंतर मॅक्सवेलने डाव सावरला. मॅक्सवेलने त्यानंतर गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करीत ४६ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचा डाव ३९.१ षटकांत १६६ धावांत संपुष्टात आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळजवळ महिनाभराच्या कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या मिशेल जॉन्सनने २७ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले, तर जोश हेजलवूडने १३ धावांत २ फलंदाजांना माघारी परतवले. इंग्लंडतर्फे रवी बोपाराने ५९ चेंडूंमध्ये सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली. सलामीवीर मोईन अली (२६), जो रुट (२५) व स्टुअर्ट ब्रॉड (२४) यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. तिरंगी मालिकेत विजेतेपद पटकाविणाऱ्या यजमान आॅस्ट्रेलिया संघाचा विश्वकप स्पर्धेत सहभागी होताना आत्मविश्वास उंचावलेला राहील. विश्वकप स्पर्धेत १४ फेब्रुवारी रोजी आॅस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यादरम्यान लढत होणार आहे.लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. हेजलवूडने चौथ्या षटकात इयान बेलला (८) यष्टिरक्षक हॅडिनकडे झेल देण्यास भाग पाडले. जॉन्सनने त्यानंतर जेम्स टेलर (०४) याला तंबूचा मार्ग दाखविला. जॉन्सनने मोईन अली व इंग्लंडचा कर्णधार इयान मोर्गन (०) यांना एकापाठोपाठ माघारी परतवत इंग्लंडची ४ बाद ४६ अशी अवस्था केली. बोपाराने जॉन्सनची हॅट््ट्रिक थोपविली. फॉकनरने जो रुटला पायचित करीत इंग्लंडला पाचवा धक्का दिला. फॉकनर २.३ षटके गोलंदाजी केल्यानंतर दुखापतीमुळे तंबूत परतला. त्यानंतर मॅक्सवेलच्या फिरकीची जादू बघायला मिळाली. मॅक्सवेलने जोस बटलर (१७), ख्रिस व्होक्स (०) यांना बाद केल्यानंतर रवी बोपारालाही तंबूचा मार्ग दाखविला. त्याआधी आॅस्ट्रेलियाच्या डावात मॅक्सवेलव्यतिरिक्त मिशेल मार्श (६०) व फॉकनर (नाबाद ५०) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. फॉकनरने केवळ २४ चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी केली. त्यात चार चौकार व चार षट्कारांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
आॅस्ट्रेलिया अजिंक्य
By admin | Published: February 02, 2015 3:23 AM