लंडन : यष्टिरक्षक ब्रॅड हॅडीन अखेरच्या क्षणी बाहेर पडल्यामुळे संघर्ष करणारा आॅस्ट्रेलिया संघ इंग्लंडविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या अॅशेज कसोटी सामन्यात शेन वॉटसनला संघाबाहेर ठेवू शकतो. आॅस्ट्रेलियाचे लक्ष्य हा सामना जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी करणे, हे असेल.वॉटसन कार्डिफ येथे झालेल्या पहिल्या सामन्यातील दोन्ही डावांत एकाच पद्धतीने पायचीत झाला होता. इंग्लंडने हा सामना चौथ्या दिवशीच १६९ धावांनी जिंकला.वॉटसनचा गोलंदाज म्हणूनही मायकल क्लार्कने सोफिया गार्डन्स येथे जास्त उपयोग केला नव्हता. आॅस्ट्रेलियाच्या फेअरफॅक्स मीडियाच्या रिपोर्टनुसार ३४ वर्षीय वॉटसनला लॉर्ड्स कसोटीतून बाहेर करून त्याच्या जागी अष्टपैलू मिशेल मार्शला संघात ठेवले जाऊ शकते. मार्श हा वॉटसनच्या तुलनेत ११ वर्षांनी लहान आहे. गेल्या १६ डावांत वॉटसनला फक्त दोन अर्धशतके झळकावता आली. माजी कर्णधार स्टीव्ह यानेदेखील मिशेल मार्शला वॉटसनच्या जागी पसंती दिली आहे.हॅडीनने मंगळवारी संघाबाहेर बसण्याचा निर्णय घेतला. संघाच्या प्रवक्त्यानुसार ‘कौटुंबिक’ कारणामुळे त्याने असे केले; परंतु तो संघासोबत असेल. त्यामुळे पीटर नेविल याला पदार्पणाची संधी मिळेल. डावखुरा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क लॉर्ड्स कसोटीआधी पूर्णपणे तंदुरुस्त होईल, असा आॅस्ट्रेलियाला विश्वास आहे. पहिल्या कसोटीदरम्यान घोट्याच्या दुखापतीमुळे त्याने सराव सत्रात सहभाग घेतला नव्हता.
आॅस्ट्रेलिया मालिकेत बरोबरीसाठी खेळणार
By admin | Published: July 16, 2015 2:21 AM