सिडनी : आॅस्ट्रेलियाचे लक्ष आता भारतीय दौऱ्यावर लागून राहिले आहे. त्यामुळे पाकविरुद्ध मंगळवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत आॅस्ट्रेलिया दोन फिरकी गोलंदाजांसह खेळण्याची शक्यता आहे.दुसरीकडे पाकिस्तानी संघाने आॅस्ट्रेलियात २२ वर्षांपूर्वी सिडनीत विजय मिळवल्यानंतर सलग ११ कसोटी सामने गमावले आहेत आणि आता त्यांच्यावर सलग १२ व्या कसोटीत पराभवाचा धोका निर्माण झाला आहे. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील आॅस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका आधीच जिंकली आहे. त्यांनी दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा शुक्रवारी डावाने धुव्वा उडवला होता. पराभवामुळे निराश पाकिस्तानचा ४२ वर्षीय कर्णधार मिस्बाह उल हक निवृत्ती घेण्याविषयी विचार करीत होता. तथापि, हे सिडनी कसोटीनंतरच शक्य होऊ शकते. आॅस्ट्रेलियाजवळ आता निवडीसाठी नवीन पर्याय उपलब्ध आहेत.फिरकी गोलंदाज स्टीव्ह ओकिफे आणि एशटन एगर यांना सिडनीतील कसोटीसाठी १३ सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे. सिडनी मैदान फिरकीला पोषक ठरण्याची आशा आहे. आॅस्ट्रेलिया फेब्रुवारी आणि मार्चमध्ये चार कसोटींसाठी भारत दौरा करणार आहे. तेथे फिरकीसाठी पोषक खेळपट्ट्या असणार आहेत. त्यामुळे ओकिफे आणि एगर यांच्याकडे दावा सिद्ध करण्यासाठी चांगली संधी असेल.
आॅस्ट्रेलिया दोन फिरकी गोलंदाज खेळवणार?
By admin | Published: January 02, 2017 12:32 AM