ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. १८ - तिरंगी मालिकेत रंगतदार सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारतावर ४ गडी राखून विजय मिळवला. भारताने दिलेले २६८ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ४९ षटकांमध्ये गाठले असून सलामीवीर अॅरोन फिंचच्या ९६ धावांच्या खेळीने कांगारुनी भारतावर विजय मिळवला.
भारताचे २६८ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची सुरुवात चांगली झाली. अॅरोन फिंच आणि डेव्हीड वॉर्नर या जो़डीने अर्धशतकी सलामी करुन दिली. उमेश यादवने वॉर्नर २४ धावांवर असताना त्याला बाद केले. फिंचने शेन वॉटसनसोबत संघाला शंभरी गाठून दिली. संघाच्या ११५ धावांवर असताना वॉटसन (४१ धावा) बाद झाला. ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर भारताचा मारा निष्प्रभ ठरत होता. ऑस्ट्रेलियाने दोन गडी गमावत दोनशेचा पल्लाही ओलांडला होता. स्टीव्ह स्मिथ ४७ धावांवर असताना मोहम्मद शमीने त्याला बाद केले. त्यापाठोपाठ सलामीवीर अॅरोन फिंचही ९६ धावांवर बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद २१९ अशी झाली. आर. अश्विनने जॉर्ज बेलीला स्वस्तात माघारी पाठवून ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद २३० अशी केली. लागोपाठ तीन विकेट गेल्याने सामन्याला कलाटणी मिळाली आणि सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला. ग्लेन मॅक्सवेल २० धावांवर बाद झाल्याने ऑस्ट्रेलिया ६ बाद २४८ अशा अवस्थेत होता. कांगारुंना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला १७ चेंडूत २० धावांची गरज होती. अक्षर पटेलने अचूक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखले. १२ चेंडूत १५ धावा अशा रोमहर्षक स्थितीत सामना पोहोचला होता. मात्र भुवनेश्वर कुमारने टाकलेल्या ४९ व्या षटकात जेम्स फॉल्कनर आणि ब्रॅ़ड हॅडीन यांनी एकाच षटकात १५ धावा ठोकून संघाला विजय मिळवून दिला. सामन्यात सहा विकेट घेणारा मिशेल स्टार्कला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.