ऑनलाइन लोकमत
धरमशाला, दि. 28 - चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भावनांवर नियंत्रण ठेवता न आल्याबद्दल ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने माफी मागितली आहे. सामना संपल्यानंतर पारितोषिक वितरणाच्यावेळी बोलताना स्मिथने आपली चूक मान्य केली. मालिका सुरु असताना मला माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याबद्दल मी माफी मागतो असे स्मिथ म्हणाला.
भारताने मंगळवारी शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर आठ विकेटने विजय मिळवून मालिका 2-1ने जिंकली. कर्णधार या नात्याने स्मिथने या दौ-यात उत्तम कामगिरी केली. त्याने तीन कसोटी शतकांसह 499 धावा केल्या. या मालिकेतील तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. माझ्या करीयरमधील ही उत्तम मालिका आहे. ज्या पद्धतीने आम्ही इथल्या वातावरणाशी जुळवून घेतले आणि भारतीयांना आव्हान दिले ते सर्व विलक्षण होते असे 27 वर्षीय स्मिथ म्हणाला.
भारत-ऑस्ट्रेलियामधील ही चार कसोटी सामन्यांची मालिका प्रत्यक्ष मैदानावरील क्रिकेटपेक्षा शाब्दीक वादावादीसाठी जास्त लक्षात राहिली. बंगळुरुच्या दुस-या कसोटीतील डीआरएसचा वाद प्रचंड गाजला. कर्णधार स्मिथने डीआरएसचा कौल घेण्यासाठी ऑस्ट्रेलियन ड्रेंसिग रुमकडे मागितलेल्या मदतीवर कर्णधार विराट कोहलीने जोरदार टीका केली.
स्मिथनेही नंतर आपली चूक मान्य केली. पण दोन्ही संघातील वातावरण इतके तापले होते कि, रांचीच्या तिस-या कसोटीत मैदानावर या वादाचे पडसाद उमटू नये यासाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी परस्परांची भेट घेऊन वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.