मेलबोर्न : ऐश बार्टी हिने बिगर मानांकित मेडिसन क्रिझचा पराभव करीत ऑस्ट्रेलियन ओपनटेनिसच्या महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली. बार्टीकडून यजमान ऑस्ट्रेलियाला यंदा जेतेपदाचा दुष्काळ संपविण्याच्या आशा आहेत. एकतर्फी उपांत्य सामन्यात बार्टीने मेडिसनचा ६-१, ६-३ ने पराभव केला.बार्टी ही १९८० ला वेंडी टर्नबूलनंतर स्थानिक ग्रॅन्डस्लॅममध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरली आहे. ऑस्ट्रेलियाच्या एकाही खेळाडूने १९७८ चा ख्रिस ओनीलचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकाविलेले नाही. अव्वल मानांकित बार्टीने उपांत्य फेरीपर्यंतच्या प्रवासात केवळ १७ गेम गमावले. २०१७ च्या अमेरिकन ओपनची विजेती राहिलेल्या मेडिसनविरुद्ध तिने आज संपूर्ण वर्चस्व गाजविले. बार्टीने याआधी विम्बल्डनचे ग्रास कोर्ट तसेच फ्रेंच ओपनच्या क्ले कोर्टवर जेतेपदाचा मान मिळविला असून आता हार्डकोर्टवर जेतेपदापासून ती केवळ एक पाऊल दूर आहे.
‘कांगारु’मध्येच रंगणार पुरुष दुहेरीची अंतिम लढतऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीची अंतिम लढत ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्येच रंगणार आहे. निक किर्गिओस-थानासी कोकिनाकिस यांनी अंतिम फेरीत धडक मारताना मार्सेल ग्रेनोलर्स (स्पेन)-होरालियो जेबालोस (अर्जेंटिना) यांचा ७-६, ६-४ असा पराभव केला. दुसरीकडे, मॅथ्यू एबडन-मॅक्स पुर्सेल यांनीही अंतिम फेरीत प्रवेश करताना राजीव राम (अमेरिका)-जो सॅलीसरी (ब्रिटन) यांचा ६-३, ७-६ असा पराभव केला. जेतेपदासाठी किर्गिओस-कोकिनाकिस आणि एबडन-पुर्सेल हे चारही ऑस्ट्रेलियन खेळाडू भिडतील.