ललित झांबरे : अमेरिकेच्या 21 वर्षीय सोफिया केनिनच्या रुपात टेनिस जगताला नवी ग्रँड स्लॅम विजेती मिळाली आहे.ती शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीत चॅम्पियन ठरली. अंतिम सामन्यात तिने स्पेनच्या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धा विजेत्या गर्बाईन मुगुरूझा हिच्यावर $4-6, 6-2,6-2 असा विजय मिळवला. सोफियाचे हे पहिलेच ग्रँड स्लॅम विजेतेपद मात्र यापेक्षाही या सामन्याचे आगळेवेगळे वैशिष्टय आहे ज्यामुळे टेनिस इतिहासात हा सामना कायमसाठी वेगळा म्हणून नेमला जाईल.
हे वैशिष्टय म्हणजे या सामन्यातील दोन्ही खेळाडू, सोफिया आणि गर्बाईन, या जन्मल्या दुसºया देशात आणि हा सामना खेळल्या दुसºयाच देशासाठी. सोफिया ही जन्माने रशियन, मॉस्को शहर हे तिचे जन्मगाव आणि आता ती अमेरिकेचे प्रतिनिधीत्व करतेय. त्याचप्रमाणे गर्बाईन ही स्पेनतर्फे खेळत असली तरी ती जन्माने व्हेनेझुलीयन आहे. व्हेनेझुएलातील कॅराकस हे तिचे जन्मस्थळ आहे.
ऑस्ट्रेलियन ओपनच्या इतिहासातील या प्रकारचा आठवणारा आधीचा महिला एकेरी अंतिम सामना १९९७ चा. त्यावेळी मार्टिना हिंगीस ही मेरी पियर्सला नमवून अजिंक्य ठरली. यापैकी मार्टिना हिंगीस ही जन्मली स्लोव्हेकियात पण खेळली स्वीत्झर्लंडसाठी तर मेरी पियर्सचा जन्म कॅनडातला पण ती खेळली फ्रान्ससाठी. केनिन- मुगुरूझा लढतीने २३ वर्षांपूर्वीच्या त्या सामन्याच्या आठवणी जागवल्या.