ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला आपण स्टंप उचलून मारणार होतो असं ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर एड कोवान याने सांगितलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामन्यादरम्यान निर्माण झालेल्या तणावावर बोलताना एड कोवान याने विराट कोहलीसोबत झालेल्या आपल्या भांडणाची आठवण काढली आहे. विराटसोबत झालेल्या आपल्या भांडणाची घटना आठवताना ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर एड कोवान याने सांगितलं की, "विराटने काही अपशब्द वापरल्यानंतर त्याला स्टंप काढून मारण्याची इच्छा झाली होती".
भारताने चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. या कसोटी मालिकेत अनेक वाद झाले. या सर्व वादांमध्ये दोन खेळाडू केंद्रस्थानी राहिले ते म्हणजे दोन्ही संघाचे कर्णधार विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ. त्यांच्यातील हा वाद त्यांनी आपापसात भेट घेऊन मिटवला तरी मैदनाबाहेर मात्र तणाव शांत झाला नाही. ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंपासून ते मीडियापर्यंत अनेकांनी विराटला टार्गेट करण्यास सुरुवात केली. स्टीव्ह स्मिथने तर कसोटी मालिक संपल्यानंतर माफीही मागितली.
फॉक्स स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत एड कोवानने सांगितलं आहे की, "त्या मालिकेदरम्यान माझी आई खूप आजारी होती, त्यावेळी विराटने अशी काही टिप्पणी केली होती जी अत्यंत चुकीची होती. जोपर्यंत अम्पायरनी येऊन तू सीमा पार केली असल्याचं सांगितलं नाही तोपर्यंत त्याला आपण चुकीचं केल्याची जाणीव झाली नव्हती. जेव्हा अम्पायरने त्याला सांगितलं तेव्हा कुठे त्याने मागे हटत माफी मागितली. त्यावेळी एक क्षण असा आला होता जेव्हा मला स्टंप काढून त्याला मारण्याची इच्छा झाली होती".
मात्र आपण विराट कोहलीचा चाहता असल्याचंही एड कोवानने सांगितलं आहे. "मला चुकीचं समजू नका. मी त्याच्या खेळीचा खूप मोठा चाहता आहे. विराट कोहली एक उत्तम खेळाडू असल्याचं", एड कोवान बोलला आहे.
‘ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आता माझे मित्र राहिले नाहीत, असे वक्तव्य करीत मालिका संपल्यानंतर मोठ्या मनाने प्रतिस्पर्धी संघाशी हात मिळविणे टाळल्याप्रकरणी भारतीय कर्णधार विराट कोहली याला ऑस्ट्रेलियन मीडियाने बालिश आणि गर्विष्ठ संबोधत टार्गेट केले.
रांची कसोटीतील कृत्याबद्दल कोहलीनेही माफी मागायला हवी होती. पण त्याने तसे काहीच केले नाही, असेही एका ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रात छापून आले होते. बॉर्डर-गावसकर मालिका संपुष्टात आली असली तरी, ऑस्ट्रेलियन मीडियाने भारताचा कर्णधार विराट कोहलीविरोधात उघडलेली मोहीम संपलेली दिसत नाही. कोहलीची तुलना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केल्यानंतर ऑस्ट्रेलियातील मीडियाने पुन्हा एकदा कोहलीवर टीका केली . विराट कोहली बालिश आणि गर्विष्ठ असल्याचे ऑस्ट्रेलियातील ‘डेली टेलिग्राफ’ वृत्तपत्राने प्रकाशित केले होते.