ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 23 - भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यास पुण्याच्या गहुंजे स्टेडियममध्ये आज सुरूवात झाली. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचे समामिवीर डेव्हिड वॉर्नर आणि मॅट रेन्शॉ यांनी सावध सुरूवात केली होती. मात्र, लंचपूर्वी 28 व्या षटकात जलदगती गोलंदाज उमेश यादवने डेव्हिड वॉर्नरला (38) त्रिफळाचीत करत भारताला मोठं यश मिळवून दिलं. पुढच्याच चेंडूवर दुसरा सलामिवीर रेन्शॉने (36) पोटदुखीमुळे मैदान सोडलं आणि तो रिटायर्ड हर्ट झाला.
सध्या कांगारूंचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि शॉन मार्श मैदानावर असून ऑस्ट्रेलियाने धावांचं शतक पूर्ण केलं आहे. भारताने या सामन्यात तीन फिरकी गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला असून अश्विन आणि जाडेडासोबत तरूण गोलंदाज जयंत यादवला संधी देण्यात आली आहे.
गेल्या तब्बल 19 सामन्यांत अपराजित राहण्याचा पराक्रम केलेला भारतीय संघाचं या सामन्यात पारडं जड मानलं जात आहे. ही लढत जिंकून विजयी मालिका कायम राखण्याचा यजमान संघाचा प्रयत्न असेल, तर दुसरीकडे भारताच्या भूमीवर तब्बल एक तपानंतर विजयी पताका फडकवण्यासाठी कांगारू प्रयत्नांची पराकाष्ठा करतील.
कर्णधार विराट कोहलीचा संघ सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याच्या नेतृत्वाखाली या संघाने अलीकडे बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज या संघांना पाणी पाजले आहे. २०१५ पासून भारताने सलग ६ मालिका जिंकण्याचा पराक्रम केलाय. ही मालिका जिंकून सातवी मालिकाही खिशात घालण्यासाठी भारत उत्सुक असणार आहे.