ऑनलाइन लोकमतरांची, दि. 14 - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर करंडक कसोटी मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. त्यामुळे गुरुवारपासून होणाऱ्या रांची कसोटीला महत्त्व आले आहे. मात्र या कसोटीपूर्वीच ऑस्ट्रेलियन संघात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या चिंतेचे कारण भारताचे फलंदाज वा गोलंदाज नसून रांचीतील खेळपट्टी आहे.मालिकेतील याआधीचे दोन कसोटी सामने खेळवण्यात आलेल्या पुणे आणि बंगळुरूतील खेळपट्ट्यांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यातल्या त्यात बंगळुरूची खेळपट्टी बरी असल्याने तेथील सामना चार दिवस चालला. पण पुण्यातील कसोटी अडीच दिवसांतच आटोपली होती. आता तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येणारी रांचीतील खेळपट्टी पुण्याहून अधिक फिरकीला साथ देणारी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघव्यवस्थापनाची चिंता वाढली आहे.
( विराटसेना 'बंगळुरू टेस्ट'मध्ये पास! पण...) रांचीच्या खेळपट्टीवर चेंडूला पुण्यापेक्षा अधिक फिरकी मिळेल, अशी शंका ऑस्ट्रेलियन संघाला आहे. सिडनी मॉर्निंग हेरॉल्डने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे. भारताचा अव्वल फिरकीपटी रवीचंद्रन अश्विनची गोलंदाजी डोळ्यासमोर ठेवून ही खेळपट्टी तयार करण्यात आल्याचा ऑस्ट्रेलियन संघव्यवस्थापनाचा अंदाज आहे. तसेच खेळपट्टीवरून चेंडूला मिळणाऱ्या उसळीबाबतही ऑस्ट्रेलियाला चिंता आहे.