बर्गिंहॅम : ऑस्ट्रेलियाची जलतरणपटू (Swimmer) एमा मॅकॉनने (Emma Mckeon) महिलांच्या ५० मीटर फ्रीस्टाइलमध्ये सुवर्ण पदक जिंकून नवीन इतिहास रचला आहे. लक्षणीय बाब म्हणजे ती राष्ट्रकुल स्पर्धेतील (Commonwealth Games) सर्वात यशस्वी खेळाडू ठरली आहे. मॅकॉनने ग्लासगो आणि गोल्ड कोस्टमध्ये आपल्या सुवर्ण कामगिरीच्या जोरावर राष्ट्रकुल स्पर्धेतील आपले ११ वे सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला आहे.
२८ वर्षीय मॅकॉनचे बर्गिंहॅम खेळांमधील हे तिसरे सुवर्ण पदक आहे. यापूर्वी तिने ४x१०० मीटर फ्रीस्टाइल आणि ४x१०० मीटर मिश्रित रिले गटामध्ये सुवर्ण पदक पटकावले होते. मॅकॉनच्याच नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने महिलांच्या ५० मीटर फ्रीस्टाइलमध्ये तिन्ही सुवर्ण पदकांवर आपले नाव कोरले आहे. मॅकॉनने केवळ २३.९९ सेकंदातच अंतर गाठले. तिची सहकारी खेळाडू मेग हॅरिसने रौप्य तर शायना जॅकने कांस्यपदक पटकावले.
राष्ट्रकुल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा दबदबाऑस्ट्रेलियाच्या जलतरणपटूंनी आपला दबदबा कायम ठेवून महिलांच्या ४x२०० मीटर फ्रीस्टाइलमध्येही सुवर्ण जिंकून वर्चस्व राखले. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक पदके जिंकणारा देश म्हणून देखील ऑस्ट्रेलियाला ओळखले जाते. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी सर्वाधिक पदके जिंकली आहेत. तर या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारताने आतापर्यंत तीन सुवर्णपदके जिंकली आहेत. तर भारताच्या खात्यात एकूण ७ पदकांचा समावेश झाला आहे.