सिडनी : भारताविरुद्ध झालेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत आॅस्ट्रेलियन खेळाडूंनी केलेल्या गचाळ क्षेत्ररक्षणानंतर आता आगामी तिरंगी मालिकेसाठी कांगारू संघाचे क्षेत्ररक्षण सल्लागार म्हणून माईक यंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे़क्रिकेट आॅस्ट्रेलियाने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, आॅस्ट्रेलियाचे क्षेत्ररक्षण सल्लागार ग्रेग ब्लीवेट कौटुंबिक कारणामुळे संघासोबत राहू शकत नाहीत. त्यामुळे आगामी वन-डे मालिकेसाठी, तसेच वन-डे वर्ल्डकपमध्ये यंग आॅस्ट्रेलियाचे क्षेत्ररक्षण सल्लागार म्हणून काम बघतील़भारताविरुद्धच्या झालेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत आॅस्ट्रेलियाने २-०ने सरशी साधली होती; मात्र यजमान संघातील खेळाडूंनी अनेक महत्त्वाचे झेल सोडले होते़ तसेच फिल्डिंगमध्ये खेळाडंूना विशेष कामगिरी करता आली नव्हती़ त्यामुळे आता यंग यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे़ आॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन याने यंग यांच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला़ लेहमन पुढे म्हणाला, भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत आॅस्ट्रेलियन खेळाडूंना क्षेत्ररक्षणात विशेष कामगिरी करता आली नाही; मात्र मालिका जिंकू शकलो, याचे समाधान आहे़ आता यंग आल्यानंतर संघाच्या क्षेत्ररक्षणात सुधारणा होईल, अशी आशा आहे़ (वृत्तसंस्था)
माईक यंग सुधारणार आॅस्ट्रेलियाची फिल्डिंग
By admin | Published: January 10, 2015 11:42 PM