मोहाली : कर्णधार स्टिव्हन स्मिथ व शेन वॉटसन यांनी उपयुक्त योगदान दिल्यानंतर जेम्स फॉकनरच्या अचूक माऱ्याच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने शुक्रवारी खेळल्या गेलेल्या लढतीत पाकिस्तानचा २१ धावांनी पराभव केला आणि टी-२० विश्वकप क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम राखल्या. चार सामन्यांत तिसऱ्यांदा पराभवाला सामोरे जाणाऱ्या पाकिस्तान संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. आॅस्ट्रेलियाचा स्पर्धेतील हा दुसरा विजय असून भारताविरुद्ध २७ मार्च रोजी याच मैदानावर खेळल्या जाणाऱ्या लढतीला आता उपांत्यपूर्व फेरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भारताच्या खात्यावरही दोन विजयाची नोंद आहे. भारत-आॅस्ट्रेलिया लढतीतील विजेता संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे. सुपर १०च्या ग्रुप दोनमध्ये न्यूझीलंडने यापूर्वीच अंतिम चार संघात स्थान निश्चित केले आहे.आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारताना ४ बाद १९३ धावांची दमदार मजल मारली. त्यांची एकवेळ ३ बाद ५७ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर स्मिथने (नाबाद ६१ धावा, ४३ चेंडू) डाव सावरला. त्याने ग्लेन मॅक्सवेलसोबत (३० धावा, १८ चेंडू) चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची तर शेन वॉटसनसोबत (४४ धावा, २१ चेंडू) पाचव्या विकेटसाठी ७४ धावांची अभेद्य भागीदारी केली. स्मिथ व वॉटसन यांनी अखेरच्या चार षटकांमध्ये ५८ धावा वसूल केल्या. ही चार षटके अखेर अंतर स्पष्ट करणारी ठरली. पाकिस्तानला अखेरच्या चार षटकांत विजयासाठी ५९ धावांची गरज होती, पण त्यांना ३७ धावा फटकावता आल्या. दरम्यान, या कालावधीत त्यांचे चार फलंदाज बाद झाले. फॉकनरने २७ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेत पाकिस्तानला ८ बाद १७२ धावांत रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानतर्फे खालिद लतीफने सर्वाधिक ४६ धावा फटकावल्या तर शोएब मलिकने नाबाद ४० धावांची खेळी केली. उमर अकमल (३२) व शरजील खान (३०) यांना मोठी खेळी करता आली नाही. शरजीलने गेल्या लढतीप्रमाणे या लढतीतही पाकला आक्रमक सुरुवात करून दिली. त्याने डावाच्या दुसऱ्या षटकात नॅथन कुल्टर नाईलच्या गोलंदाजीवर तीन चौकार वसूल केले. शरजीलचा सलामीचा सहकारी अहमद शहजाद (१) पुन्हा एकदा अपयशी ठरला. जोश हेडलवुडने त्याला माघारी परतवले. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलकआॅस्ट्रेलिया : २० षटकांत ४ बाद १९३ धावा (स्टिव्हन स्मिथ नाबाद ६१, शेन वॉटसन नाबाद ४४, ग्लेन मॅक्सवेल ३०; रियाज ३५-२, वसीम ३१-२.) वि. वि. पाकिस्तान : २० षटकांत ८ बाद १७२ धावा ( खालिद लतीफ ४६, शोएब मलिक नाबाद ४०, उमर अकमल त्रि. गो. जम्पा ३२, शारजील खान; फॉकनर ४-०-२७-५, जम्पा ४-०-३२-२.
आॅस्ट्रेलियाची सरशी
By admin | Published: March 26, 2016 2:16 AM