कोलंबो : लेफ्ट आर्म स्पिनर रंगना हेराथ (६४ धावांत ७ बळी) याच्या जादुई गोलंदाजीच्या बळावर श्रीलंकेने आॅस्ट्रेलियाला तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीच्या पाचव्या दिवशी बुधवारी १६३ धावांनी मात करीत मालिकेत प्रतिस्पर्धी संघाचा ३-0 ने सफाया केला.श्रीलंकेने पाचव्या दिवशी त्यांचा दुसरा डाव ८ बाद ३४७ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर विजयासाठी मिळालेल्या ३२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणारा आॅस्ट्रेलिया संघ चहापानाच्या अर्ध्या तास आधी १६0 धावांत गारद झाला आणि यजमान संघाने कसोटीत १६३ धावांनी विजय मिळवला.रंगना हेराथच्या जादुई फिरकीसमोर आॅस्ट्रेलियन फलंदाजांनी शरणागती पत्करली. पहिल्या डावात ६ बळी घेणाऱ्या हेराथने पाहुण्या संघाच्या फलंदाजीच्या फळीची कंबर तोडताना मधल्या आणि तळातील फलंदाजांना तंबूत धाडले. तो सामनावीर आणि मालिकावीराचा मानकरी ठरला.त्याआधी श्रीलंकेने पालेकल येथे झालेल्या कसोटीत १0६ आणि गॅले येथील दुसऱ्या कसोटीत २२९ धावांनी विजय मिळवला होता. आॅस्ट्रेलियाचा पूर्ण सफाया करण्याची श्रीलंकेची ही पहिलीच वेळ ठरली. या पराभवाबरोबरच आॅस्ट्रेलियाची सांघिक रँकिंगमध्ये घसरण होऊन ते पहिल्या स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत.श्रीलंकेने पाचव्या दिवशी आपला दुसरा डाव ३४७ धावांवर घोषित करीत ३२३ धावांची आघाडी मिळवली. कौशल सिल्वा (११५) याच्याशिवाय पहिल्या डावातील शतकवीर धनंजय डीसिल्वा यानेदेखील नाबाद ६५ धावांची खेळी केली.विजयासाठी मिळालेल्या ३२४ धावांचा पाठलाग करणाऱ्या आॅस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. डेव्हिड वॉर्नर आणि शॉन मार्श या सलामीवीरांनी आॅस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी सलामीसाठी ७७ धावांची भागीदारी केली. दिलरुवान परेराने मार्श (२३) याला मेंडिसकरवी झेलबाद करीत पाहुण्यांना पहिला धक्का दिला. त्यानंतर हेराथने आपल्या जादुई फिरकीने आॅस्ट्रेलियाची फलंदाजीची फळी उद्ध्वस्त केली. आॅस्ट्रेलियाची फलंदाजीची फळी फ्लॉप ठरली आणि पूर्णसंघ ४४.१ षटकांत १६0 धावांत गारद झाला. (वृत्तसंस्था)
श्रीलंकेकडून आॅस्ट्रेलियाचा धुव्वा
By admin | Published: August 18, 2016 1:32 AM