मेलबोर्न : आगामी वन-डे सामन्यांच्या मालिकेत पाहुणा भारतीय संघ विश्व चॅम्पियन आॅस्ट्रेलिया संघाला कडवे आव्हान देण्याची शक्यता आहे, पण यजमान संघ पाच सामन्यांच्या मालिकेत विजयाचा प्रबळ दावेदार आहे, असे मत आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार इयान चॅपेलने व्यक्त केले. पाहुण्या संघात स्पेशालिस्ट फलंदाजांची उणीव आहे, असेही चॅपेल म्हणाला. चॅपेलने म्हटले, की पाहुण्या संघाला एका स्पेशालिस्ट फलंदाजाची उणीव भासेल. त्याचप्रमाणे येथील वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्यावर भारताच्या वेगवान गोलंदाजांची आॅस्ट्रेलियन फलंदाजांपुढे खरी परीक्षा राहील. विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत विशेष चुरस अनुभवायला मिळाली नसल्यामुळे भारताविरुद्धच्या मालिकेच्या निमित्ताने चाहत्यांना संघर्षपूर्ण खेळ बघण्याची संधी मिळणार आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विश्वविजेत्या संघापुढे आव्हान निर्माण करण्यास सक्षम आहे.दरम्यान, पहिल्या दोन सामन्यांत आॅस्ट्रेलिया संघ मानसिकदृष्ट्या वरचढ ठरण्याची शक्यता वर्तविताना चॅपेल म्हणाला, की भारतीय संघात अनेक अष्टपैलू खेळाडू नाहीत. विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यासह भारतीय संघातील आघाडीचे चार फलंदाज प्रतिभावान आणि आक्रमक आहेत, पण ते जर लवकर बाद झाले, तर पाहुणा संघ दडपणाखाली येईल. मायदेशातील वातावरणात आॅस्ट्रेलियन फलंदाज भारतीय गोलंदाजांपुढे अधिक मजबूत भासत आहेत. (वृत्तसंस्था)भारतीय संघात काही दिग्गज खेळाडूंचा समावेश असून, आॅस्ट्रेलिया संघाला दडपणाखाली आणण्यास सक्षम आहे, पण यजमान संघ पराभूत होईल, असे चित्र नाही. कारण उभय संघ भारतात मार्च-एप्रिल महिन्यात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेची तयारी करीत आहेत.- इयान चॅपेल
भारताविरुद्धच्या मालिकेत आॅस्ट्रेलिया विजयाचा प्रबळ दावेदार
By admin | Published: January 10, 2016 4:38 AM