चंदीगढ : भारताची बॉक्सर संदीप कौरने पोलंड येथे झालेल्या 13व्या आंतरराष्ट्रीय सिलेसियन बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारतला 52 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. तिने अंतिम फेरीत पोलंडच्याच कॅरोलीना अॅम्पुस्काचा 5-0 असा पराभव केला. या 16 वर्षीय बॉक्सरला इथवर पोहोचण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. एका लहानश्या गावातून आलेल्या संदीपचा प्रवास हा थक्क करणारा आहे. तिचे वडील रिक्षाचालक आहेत.
पटियालाच्या हसनपुर गावात संदीपचा जन्म... तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फार चांगली नाही. त्यात गावातील लोकांनी संदीपला बॉक्सिंग खेळण्यास विरोध केला. मात्र, तरीही तिने आणि कुटुबीयांनी माघार घेतली नाही. संदीपचे वडील सरदार जसवीर सिंह हे पटियाला येथे रिक्षा चालवतात. त्यांनी संदीपच्या बॉक्सर बनण्याच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला.
काका सिमरनजीत सिंह यांनी संदीपला बॉक्सिंग करण्याचा सल्ला दिला. संदीप म्हणाली,''गावा शेजारीच असलेल्या अकादमीत काकांसोबत जायची. तेथे इतरांना खेळताना पाहून माझीही बॉक्सिंग करण्याची इच्छा झाली. 8 वर्षांची असताना मी पहिल्यांदा ग्लोज घातले आणि सरावाला सुरूवात केली."