paris olympics 2024 updates | पॅरिस : मराठमोळ्या अविनाश साबळेला अंतिम फेरीत म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. तो अखेरपर्यंत लढला पण त्याला अकराव्या स्थानी समाधान मानावे लागले. तो या प्रकारात अंतिम फेरीत खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. पुरूषांच्या ३००० मीटर स्टीपल चेसच्या फायनलमध्ये अविनाशला पहिल्या १० मध्येही जागा मिळवता आली नाही. मोरक्कोच्या खेळाडूने अव्वल स्थान गाठत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. याच खेळाडूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 'गोल्ड' जिंकले होते. त्याने अवघ्या ८.०६.०५ मिनिटांत लक्ष्य गाठले. तर अमेरिकेच्या खेळाडूने रौप्य आणि केनियाच्या शिलेदाराने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदक जिंकले.
अंतिम फेरीत एकूण पंधरा खेळाडू धावत होते, ज्यामध्ये भारताचा अविनाश साबळे अकराव्या स्थानी राहिला. त्याने ८.१४.१८ मिनिटांत ३ हजार मीटरचे अंतर गाठले. त्याने पात्रता फेरीतील कामगिरीपेक्षा इथे बरीच चांगली कामगिरी केली पण दुर्दैवाने पदकापासून दूरच राहावे लागले. अविनाश साबळे आजही भारतीय लष्करात आपली सेवा देत आहे.
पॅरिस ऑलिम्पिकच्या तोंडावर झालेल्या डायमंड लीगमध्ये स्टीपल चेसमध्ये अविनाशने त्याचाच जुना विक्रम मोडला होता. तेव्हा त्याने डायमंड लीगमध्ये ८ मिनिटे आणि ९.९१ सेकंदात अंतर गाठत ३००० मीटरच्या शर्यतीत सहावे स्थान पटकावले होते. यासह त्याने राष्ट्रीय विक्रम करताना त्याचा जुना विक्रम मोडला. खरे तर अविनाशने २०२२ मध्ये राष्ट्रीय विक्रम केला होता, जेव्हा तो ८.११.२० सेंकदात ३ हजार मीटर धावला होता. यावेळी मात्र त्याने १.५ सेकंदांचा कमी वेळ घेत हे अंतर पार केले होते.
अविनाशने ५ ऑगस्ट रोजी झालेल्या पात्रता फेरीच्या लढतीत ८.१५.४३ मिनिटांत अंतर गाठले होते. त्याने पाचव्या क्रमांकासह अंतिम फेरीचे तिकीट मिळवले होते. या प्रकारात अंतिम फेरी गाठणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याने पात्रता फेरीत ८.१८.१२ मिनिटांसह तत्कालीन राष्ट्रीय विक्रम केला परंतु अंतिम फेरीत तो पोहोचू शकला नव्हता. त्यामुळे ऑलिम्पिक २०२४ मध्ये अविनाश साबळेचे अंतिम फेरीत पोहोचणे केवळ ऐतिहासिकच नाही तर मागील ऑलिम्पिकपेक्षाही चांगली कामगिरी होती. एकूणच काय तर अविनाशने फायनल गाठून इतिहास रचला पण त्याला पदकापासून दूरच राहावे लागले.
दरम्यान, मराठमोळा खेळाडू अविनाश १२वी उत्तीर्ण झाल्यानंतर इंडियन आर्मीमध्ये दाखल झाला. लष्करासाठी अविनाशने सियाचीनच्या बर्फाळ हिमनदीपासून ते राजस्थानच्या वालुकामय भागापर्यंत देशाची सेवा केली. आर्मीमध्ये असताना २०१५ मध्ये त्याने ॲथलीट होण्याचा निर्णय घेतला. १३ सप्टेंबर १९९४ रोजी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मांडवा गावात जन्मलेला हा तरुण आता देशाची शान बनला आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या अविनाशला लहानपणी शाळेत जाण्यासाठी ६ किलोमीटर चालत जावे लागे, त्यामुळे तो धावतच जायचा आणि तेथूनच त्याच्यात रेसिंगची आवड कायम राहिली. २०१७ मध्ये आर्मीचे प्रशिक्षक अमरीश कुमार यांनी अविनाशला स्टीपल चेसमध्ये धावण्यास सांगितले आणि त्यानंतर अविनाशने मागे वळून पाहिले नाही.