लखनऊ : प्रीमियर बॅडमिंटन लीगमधील (पीबीएल) प्रमुख आकर्षण असलेल्या फुलराणी सायना नेहवालने आपल्या लौकीकानुसार खेळ करताना महत्त्वाची ट्रम्प लढत जिंकली. याजोरावर अवध वॉरियर्सने स्पर्धेतील पहिला विजय नोंदवताना दिल्ली एसर्सचा ४-३ असा पाडाव केला.मुंबईत झालेल्या सलामीच्या सामन्यात पायाच्या दुखापतीमुळे माघार घेतल्यानंतर सायना जबरदस्त कमबॅक केले. तीने आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर पी. तुलसीचा १५-९, १५-१० असा फडशा पाडला. सायना तुफान आक्रमण करताना केवळ ३१ मिनिटांत विजय मिळवला. तत्पूर्वी सामन्याची विजयी सुरुवात करताना दिल्लीने एकेरीत टॉमी सुगियार्तोच्या जोरावर १-० अशी आघाडी घेतली. टॉमीने एस. तानोंगसाकला १५-१३, १५-११ असे नमवले. यानंतर सायनाने आपल्या ट्रम्प लढतीत बाजी मारताना अवधला २-१ असे आघाडीवर नेले. तिसऱ्या लढतीत बोडिनइसारा - केई युन यांनी दिल्लीच्या कूकीट किएन - तान बून यांना १५-१२, १५-१४ असे पराभूत करुन अवधला ३-१ अशी मजबूत आघाडी मिळवून दिली. चौथ्या सामन्यात अवधच्या बी. साई प्रणीतने आक्रमक खेळ करताना दिल्लीकर राजीव ओसफचा १५-१२, १५-९ असा धुव्वा उडवून संघाला ४-१ अशी विजयी आघाडी मिळवून दिली. यामुळे औपचारीता राहिलेली अखेरची मिश्र दुहेरी लढत ट्रम्प असूनही दिल्लीला त्याचा फायदा झाला नाही. यावेळी अक्षय देवाल - गैब्रिएल एडकॉक यांनी झुंजार खेळाच्या जोरावर अवधच्या हेंद्रा गुनावन - के. मनिषा यांना १५-१४, १३-१५, १५-५ असे नमवले. (वृत्तसंस्था)
अवध वॉरियर्सचा पहिला विजय
By admin | Published: January 04, 2016 11:52 PM