सिडनी : फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या (१२७) आक्रमक शतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने तिरंगी मालिकेतील पहिल्या वन-डेत इंग्लंडवर ३ विकेट्सनी मात केली़ या विजयासह आॅस्ट्रेलियाने एक बोनस गुणही आपल्या नावे केला़ इंग्लंडने इयान मोर्गनच्या (१२१) शतकाच्या बळावर ४७़५ षटकांत सर्व बाद २३४ धावांचे आव्हान उभे केले़ आॅस्ट्रेलियाने हे लक्ष्य ७ गड्यांच्या बदल्यात ३९़५ षटकांत सहज पूर्ण केले़ विजयाचा शिल्पकार ठरलेल्या वॉर्नरने ११५ चेंडूंचा सामना करताना १८ खणखणीत चौकार लगावले़ सिडनी क्रिकेट मैदानावर झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या २२ सामन्यांमध्ये शतकी खेळी करणारा वॉर्नर आॅस्ट्रेलियाचा पहिलाच खेळाडू ठरला आहे़ माफक लक्ष्याचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाच्या वॉर्नरव्यतिरिक्त एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही़ मात्र, एका बाजूने वॉर्नरने इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली़ कांगारू संघाकडून स्टीवन स्मिथ याने ४७ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकारासह ३७ धावांची खेळी साकारली़ अॅरोन फिंच १५ आणि शेन वॉटसन याने १६ धावांचे योगदान दिले़ आॅस्ट्रेलियाने हे लक्ष्य ४० षटकांत आत पूर्ण केल्यामुळे त्यांच्या खात्यात बोनस गुणांसह ५ गुण जमा झाले़वॉर्नर सामनावीर पुरस्काराचा दावेदार होता़ मात्र त्याचा सहकारी मिशेल स्टार्कने ४ विकेट्स मिळविल्या़ यामुळे तोच सामन्याचा मानकरी ठरला़ इंग्लंडकडून क्रिस ओक्स याने ४ गडी बाद केले़ ख्रिस जॉर्डन आणि मोईन अली यांनी प्रत्येकी १ बळी मिळविला़ त्याआधी इंग्लंडने कर्णधार इयान मोर्गनच्या (१२१) शतकाच्या बळावर २३४ धावा केल्या़ त्याने आपल्या खेळीत ११ चौकार आणि ३ षटकार खेचले़ जोस बटलर याने २८ धावांची खेळी केली़ यानंतर एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही़ इंग्लंडचे इयान बेल (०), जेम्स टेलर (०), मोईन अली (२२) हे अनुभवी खेळाडू अपयशी ठरले़ मोर्गन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला़ स्टार्कने पहिल्या तीन चेंडूंत इंग्लंडच्या २ गड्यांना तंबूचा रस्ता दखविला़ या धक्क्यातून संघ अखेरपर्यंत सावरू शकला नाही़ आॅस्ट्रेलियाकडून जेम्स फॉल्कनर याने ३, तर पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल आणि झेविअर डोहर्टी यांनी प्रत्येकी १ बळी मिळविला़(वृत्तसंस्था)
आॅसींची विजयी सलामी
By admin | Published: January 17, 2015 2:55 AM