Asian Games 2023 : पुरुष स्क्वॉश संघाने थरारक लढतीत पाकिस्तानचा पराभव करून आशियाई स्पर्धा २०२३ मधील आजच्या दिवसातील भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. त्यानंतर टेबल टेनिसमध्ये ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली. सुतिर्था आणि अहिका या मुखर्जी भगिनींनी भारताला महिला दुहेरीचे पहिले आशियाई पदक निश्चित करून दिले. यापूर्वी भारताला एकहादी टेबल टेनिसमध्ये महिला दुहेरीचे पदक जिंकता आले नव्हते. सुतिर्था व अहिका यांनी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जागतिक विजेत्या आणि नंबर २ क्रमांकावर असलेल्या चीनच्या वँग यिदी व चेन मेंग यांचा पराभव केला.
आज भारताच्या नेमबाजांनी आणखी एक पदकाची कमाई करून दिली. सरबज्योत सिंग आणि दिव्या सुब्बाराजू यांनी शनिवारी १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक गटात रौप्यपदक जिंकले. त्यापाठोपाठ टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत ऋतुजा भोसले आणि रोहन बोपन्ना या जोडीने सुवर्णपदक जिंकले. पण, खरी चुरस स्क्वॉशच्या पुरुष सांघिक गटाच्या गोल्ड मॅचमध्ये पाहायला मिळाली. भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी समोर होते आणि भारतीय खेळाडूंनी ०-१ अशा पिछाडीवरुन मुसंडी मारली अन् २-१ असा विजय मिळवला.