केवळ देशातील नव्हे, तर जगभरातील कोट्यवधी रामभक्त गेली अनेक वर्षे जे स्वप्न पाहत होते, त्या राम मंदिराच्या स्वप्नाची पूर्ती बुधवारी होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे दिमाखदार सोहळ्यात भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी अयोध्यानगरी आणि शहरातील प्रत्येक जण सज्ज व अतिशय उत्सुक आहे. कार्यक्रमाला जेमतेम १७५ संत, महंत व विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित राहणार असले तरी हा सोहळा सर्वांना दूरदर्शनवरून थेट पाहता येणार आहे. राम मंदिराच्या भूमी पूजन होत असल्यामुळे सोशल मीडियावरही शुभेच्छा अन् कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताची माजी कुस्तीपटू आणि भाजपा नेता बबिता फोगाट हिनंही केलेलं ट्विट व्हायरल झालं आहे.
भारताची स्टार कुस्तीपटू बबिता कुमारीनं मागील वर्षात भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला. राजकारणात प्रवेश केल्यानंतर बबिता सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाली आहे. सोशल मीडियावरून तीन सातत्यानं काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांवर टीका करताना पाहायला मिळते. महाराष्ट्रातील पालघर येथे झालेल्या साधुंच्या हत्येनंतरही बबितानं उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली होती. सोशल मीडियावर बबिता सातत्यानं बबिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामांची स्तुती करतानाही दिसते.
आजच्या ऐतिहासिक दिवसाच्या निमित्ताने तिनं ट्विट केलं. ही तर सुरूवात आहे आणि यानंतर अजून बरंच काही होणार आहे, अशा आशयाचं तिनं ट्विट केलं. ''अयोध्या तो झांकी है, उसके बाद भी बहुत कुछ बाकी है,'' असे बबितानं ट्विट केलं.
बबिता फोगाटची मैदानावरील कामगिरी2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या बबिताचं क्रीडा क्षेत्रात फार मोठं नाव आहे. तिनं 2010 आणि 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकं जिंकली आहेत. 2012च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिच्या नावावर कांस्यपदक आहे, तर 2013च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही तिनं कांस्यपदक जिंकलं आहे. 2009 आणि 2011च्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णकमाई केली आहे.