पतियाळा - तामिळनाडूचा युवा अय्यासामी धारुन याने २२ व्या फेडरेशन चषक राष्ट्रीय सीनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी ४०० मी. अडथळा शर्यतीत राष्ट्रीय विक्रम नोंदवतानाच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी संघातील आपले स्थान निश्चित केले आहे.तापातून नुकत्याच सावरणाºया २१ वर्षीय धारून याने जोसेफ जी. अब्राहम्सचा १० वर्षांपूर्वीचा ४९.९४ सेकंदांचा विक्रम मोडला जो की त्याने ओसाका येथे २००७ मध्ये आॅगस्ट महिन्यात केला होता. तामिळनाडूच्या संतोष कुमारने रौप्य आणि रामचंद्रन याने कांस्यपदक जिंकले. अरपिंदर सिंग यानेही तिहेरी उडीत १६.६१ मीटर झेप घेत सुवर्ण जिंकत सलग दुसºयांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्थान मिळविले. अनुभवी रंजित महेश्वरी याला गुडघ्याची दुखापत आणि बोटाला फ्रॅक्चर झालेल्या शंकेमुळे मैदानावरून स्ट्रेचरवर नेण्यात आले. तो त्याच्या पाचव्या प्रयत्नात उडी मारण्यादरम्यान घसरला. पुरुषांच्या १५०० मी. शर्यतीत जिन्सन जॉन्सनने ३ मि. ३९.६९ सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण जिंकले. महिला गटात पी.यू. चित्राने ४ मि. १५.२५ सेकंद वेळेस सुवर्णपदक पटकावले. ११० मी. अडथळा शर्यतीत सिद्धांत थिंगाल्याने १३.७६ सेकंदासह विजेतेपद पटकावले. महिला गटात सपना कुमारने सुवर्णपदक आपल्या नावावर केले. (वृत्तसंस्था)
अय्यासामी धारुनने नोंदविला राष्ट्रीय विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 2:14 AM