न्यूयॉर्क : सेरेना विलियम्सला टाचेच्या दुखापतीमुळे शानदार सुरुवातीचा लाभ घेता आला नाही. गुरुवारी रात्री येथे यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सेरेनाला व्हिक्टोरिया अजारेंकाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे सेरेनाचे २४ वे ग्रँडस्लॅम विजेतेपदाचे स्वप्न भंगले.
अजारेंकाने आपल्या प्रतिस्पर्ध्याचा १-६, ६-३, ६-३ ने पराभव करीत २०१३ नंतर प्रथमच कुठल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. आता जेतेपदासाठी तिची लढत दोन वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन नाओमी ओसाकासोबत होईल. ओसाकाने दुसऱ्या उपांत्य लढतीत अमेरिकेच्या जेनिफर ब्राडीचा ७-६(१), ३-६, ६-३ ने पराभव केला.
आता अजारेंका आणि ओसाका यांच्यादरम्यान जेतेपदासाठी लढत होईल. या दोन्ही खेळाडूंनी यापूर्वी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान भूषविलेले आहे. अजारेंकाने या विजयासह आपली मोहीम ११ विजयापर्यंत नेली आहे तर ओसाकानेही सलग १० सामने जिंकले आहेत. (वृत्तसंस्था)