ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - भारताने तिस-या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करत सीरिजमध्ये 2-0 ची आघाडी घेतली आहे. भारताने 93 धावांनी वेस्ट इंडिजचा पराभव केला. भारताच्या या विजयात महत्वाचा वाटा उचलला तो महेंद्रसिंग धोनीने. भारताच्या विजयासोबतच धोनीने नव्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे. वेस्ट इंडिजविरोधात 78 धावांची खेळी करणा-या धोनीने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकलं आहे. धोनी आता कर्णधार नसतानाही अझरुद्दीनचा कोणता रेकॉर्ड मोडला असा विचार करत असाल तर तो आहे धावांचा.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वात जास्त धावा करणा-या खेळाडूंच्या यादीत धोनीने अझरुद्दीनला मागे टाकलं आहे. धोनीने चौथ्या क्रमांकावर झेप घेतली असून अझरुद्दीनचा रेकॉर्ड मोडला आहे.
मोहम्मद अझरुद्दीनने 334 एकदिवसीय सामने खेळताना 308 खेळींमध्ये एकूण 9378 धावा केल्या आहेत. 36.92 च्या सरासरीने मोहम्मद अझरुद्दीनने या धावा केल्या. तर इकडे धोनीने आतापर्यंत 294 एकदिवसीय सामन्यांत 254 खेळींमध्ये 51.31च्या सरासरीने 9442 धावा केल्या आहेत. धोनीचा स्ट्राईक रेट 89.14 इतका आहे.
सर्वाधिक धावा करणा-यांच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर सर्वात पुढे आहे. सचिन तेंडूलकरने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये एकूण 18426 धावा केल्या आहेत. सचिनने उभा केलेला धावांचा हा डोंगर कोणत्याही खेळाडूला सहजासहजी पार करणं शक्य होणार नाही. सचिन तेंडूलकरनंतर भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली आणि मिस्टर डिपेंडेबल राहुल द्रविडचा समावेश आहे. सौरभ गांगुलीने एकूण 11221 तर राहुल द्रविडने 10768 धावा केल्या आहेत.
धोनीच्या नावे अजून एक रेकॉर्डची नोंद आहे. आतापर्यंत 70 वेळा महेंद्रसिंग धोनी नाबाद राहिला आहे. नाबाद राहण्यामध्ये आता धोनी फक्त दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार शॉन पोलॉक आणि श्रीलंकेचा माजी गोलंदाज चामिंडा वासच्या मागे आहे. दोघेही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात 72 वेळा नाबाद राहिले आहेत.
तिस-या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा 93 धावांनी पराभव केला आहे. खडतर परिस्थितीत महेंद्रसिंग धोनीने केलेल्या 78 धावा आणि डावाच्या अखेरीस केदार जाधवने (26 चेंडूत 40 धावा) केलेल्या फटकेबाजीच्या बळावर भारताने वेस्ट इंडिजला 252 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने दिलेल्या 252 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 38.1 षटकांत केवळ 158 धावांमध्येच गारद झाला. भारताकडून फिरकी गोलंदाज आर.अश्विन आणि कुलदिप यादव यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. वेस्ट इंडिजकडून जेसन मोहम्मद याने सर्वाधिक 40 तर रोमॅन पॉवेल याने 30 धावांची खेळी करून थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला पण इतर फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. या विजयासोबतच भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अशी विजयी आघाडी घेतली आहे. महेंद्रसिंग धोनीला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.