बँकॉक : भारतीय बॅडमिंटनपटू बी. साई प्रणितने रविवारी अंतिम लढतीत पिछाडीवर पडल्यानंतर दमदार पुनरागमन करताना इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचा पराभव करीत १२०००० डॉलर पुरस्कार राशी असलेल्या थायलंड ओपनमध्ये पुरुष एकेरीत जेतेपदाचा मान मिळवला. तिसऱ्या मानांकित भारतीय खेळाडूने १ तास ११ मिनिटे रंगलेल्या अंतिम लढतीत चौथ्या मानांकित इंडोनेशियन खेळाडूचा १७-२१, २१-१८, २१-१९ ने पराभव केला. प्रणितचे हे सलग दुसरे विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने सिंगापूर ओपनमध्ये जेतेपदाचा मान मिळवला होता. जागतिक क्रमवारीत २४ व्या स्थानावर असलेल्या प्रणितला अंतिम लढतीत चांगली सुरुवात करता आली नाही. त्याने पहिला गेम गमावला. इंडोनेशियाच्या खेळाडूने पहिल्या गेममध्ये सुरुवातीला ३-० अशी आघाडी घेतली होती, पण प्रणितने लवकरच ४-४ आणि ७-७ अशी बरोबरी साधली. क्रिस्टीने त्यानंतर १४-११ अशी आघाडी घेतली, पण प्रणितने तीन गुण वसूल करीत १४-१४ अशी बरोबरी साधली. क्रिस्टीने त्यानंतर १८-१७ अशी आघाडी घेतली आणि सलग तीन गुण वसूल करीत गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये प्रणितने दमदार पुनरागमन करीत सुरुवातीला ५-० आणि त्यानंतर ९-३ अशी आघाडी घेतली. क्रिस्टीने सलग सहा गुण घेत ९-९ अशी बरोबरी साधली. उभय खेळाडूंदरम्यान त्यानंतर १५-१५ अशी बरोबरी होती. प्रणितने १७-१६ च्या स्कोअरवर सलग तीन गुण वसूल करीत आघाडी घेतली आणि त्यानंतर २१-१८ ने गेम जिंकत १-१ने बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये क्रिस्टीने २-२ च्या स्कोअरवर सलग पाच गुण वसूल करत ७-२ अशी आघाडी घेतली. प्रणितने पुनरागमन करताना ७-८ असा स्कोअर केला. उभय खेळाडूंदरम्यान १७-१७ अशी बरोबरी होती. त्यानंतर प्रणितने महत्त्वाचे दोन गुण वसूल करीत १९-१७ अशी आघाडी घेतली. क्रिस्टीने दोन गुण वसूल करीत १९-१९ अशी बरोबरी साधली, पण भारतीय खेळाडूने त्यानंतर सलग दोन गुण घेत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ‘मी केवळ रॅलीवर लक्ष केंद्रित करीत होतो. लढत चुरशीची होती. त्यानंतर मी जम बसविण्याचा प्रयत्न केला आणि विजय मिळाल्यामुळे आनंद झाला. माझे समर्थन करणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे.’ - बी. साई प्रणित
बी. साई प्रणितला अजिंक्यपद
By admin | Published: June 05, 2017 3:53 AM