नवी दिल्ली : खराब कालखंडामुळे रिओ आॅलिम्पिकची तयारी करण्यास मदत मिळाली असून, पुढील महिन्यात रिओ आॅलिम्पिकमध्ये आपण छुपे रुस्तुम म्हणून पुढे येऊ, अशी आशा व्यक्त केली आहे भारताचा बॅडमिंटनपटू के. श्रीकांत याने.श्रीकांत २०१४मध्ये चायना ओपनबरोबरच सुपर सिरीज प्रिमीअर पुरुष विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय ठरला होता आणि त्यादरम्यान त्याने फायनलमध्ये दोन वेळचा आॅलिम्पिक आणि पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन लिन डॅन याला धूळ चारली होती. त्यानंतर घरच्या भूमीवर इंडियन सुपर सिरीजचेदेखील विजेतेपद त्याने पटकावले होते. तसेच, गेल्या वर्षी जून महिन्यात तो जगातील तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडूदेखील बनला होता; परंतु त्यानंतर त्याच्या कामगिरीत घसरण झाली होती. आॅलिम्पिक क्वॉलिफिकेशनदरम्यानही श्रीकांतला संघर्ष करावा लागला आणि अनेक स्पर्धांत तो दुसरी फेरीदेखील गाठू शकला नाही. विशेषत:, जानेवारीत सय्यद मोदी ग्रां. प्री. गोल्डचे विजेतेपद पटकावल्यानंतर.सध्या जगातील ११व्या क्रमांकाचा खेळाडू श्रीकांत म्हणाला, ‘‘मी आपल्या रँकिंगविषयी चिंतित नाही. मला ट्रेनिंगला वेळ मिळत नव्हता म्हणून चिंताग्रस्त होतो. मी पीबीएल, मलेशिया, सॅफ, जर्मनी ओपन व एबीसी या स्पर्धा सातत्याने खेळत होतो. त्यामुळे मला वेळच मिळत नव्हता; परंतु मला ज्या विभागात काम करायची आवश्यकता आहे आणि त्यामुळे आॅलिम्पिकची तयारी करण्यास माझी मदत होईल, याची मला जाणीव झाली. तुम्ही पराभूत व्हा अथवा जिंका; प्रत्येक सामना, प्रत्येक स्पर्धा महत्त्वाची असते. त्याकडे तुम्ही कसे पाहता, हे महत्त्वाचे. तुम्हाला प्रत्येक सामन्यात सकारात्मक बाजू पाहावी लागते. त्यामुळे त्यातून मला मदत मिळाली.’’रिओत श्रीकांतला लिन डॅनशिवाय मलेशियाचा ली चोंग वेईसारख्या खेळाडूंचा सामना करावा लागेल. तो म्हणाला, ‘‘ते सर्वांत अनुभवी खेळाडू आहेत आणि त्याने गेल्या दोन-तीन आॅलिम्पिकमध्ये सहभागी झाले आहेत. ते चांगल्या स्थितीत आहेत, असे मला वाटते; परंतु प्रत्येक वेळी अनुकूल स्थिती असतेच, असे नाही.’’ (वृत्तसंस्था)