नवी दिल्ली - इंडोनेशिया ओपन स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर चिराग शेट्टी-सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी या भारताच्या अव्वल दुहेरी पुरुष जोडीला जागतिक क्रमवारीत फटका बसला. त्यांना अव्वल स्थान गमवावे लागले असून जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत चिराग-सात्त्विक यांची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. पुरुष एकेरीत एच. एस. प्रणॉयने आपले दहावे स्थान कायम राखले आहे.
चीनच्या लियांग वेई केंग-वँग चँग नई यांनी पुरुष दुहेरीत अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर किम एस्ट्रूप-अँडर्स स्कारुप रासमुसेन या डेन्मार्कच्या जोडीने दुसरे स्थान मिळवले. मे महिन्यात चिराग-सात्त्विक यांनी थायलंड ओपन जेतेपद पटकावत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते. मात्र, गेल्या महिन्यात सिंगापूर ओपनच्या पहिल्याच फेरीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी इंडोनेशिया ओपन स्पर्धेतून माघार घेतली आणि सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमधूनही त्यांनी माघार घेतली आहे.
पुरुष एकेरीत प्रणॉय दहाव्या, तर लक्ष्य सेन १४व्या स्थानी कायम आहेत. किदाम्बी श्रीकांतची ३२व्या स्थानी घसरण झाली आहे. महिलांमध्ये स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू दहाव्या स्थानी कायम आहे. तनीषा क्रास्टो-अश्विनी पोनप्पा यांची जोडी १९व्या स्थानी असून त्रिशा जॉली-गायत्री गोपीचंद २४व्या क्रमांकावर आहेत.