Badminton Player Saina Nehwal : सायना नेहवाल मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिने भारतातील क्रीडा संस्कृती आणि भारतीयांचे क्रिकेटवर असलेले प्रेम. याबद्दल भाष्य करून अनेक प्रश्न उपस्थित केले. याशिवाय सायनाने भारतीयांना फटकारताना इतरही खेळांना प्राधान्य द्यायला हवे असे सांगितले. अलीकडेच तिने भालाफेकबद्दल एक विधान केले होते. नीरज चोप्रा सुवर्ण पदक जिंकेपर्यंत मला या खेळाबद्दल अजिबात माहिती नव्हती असे तिने म्हटले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने गोल्डन कामगिरी केल्यानंतर अनेकांना या खेळाबद्दल समजले असे तिने सांगितले होते. सायना नेहवालच्या या विधानानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली.
सायनाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. 'सायना नेहवाल म्हणजे क्रीडा क्षेत्रातील कंगना रनौत' अशा शब्दांत चाहत्यांनी टीका केली. मग एका वृत्तपत्राच्या पोस्टवर व्यक्त होताना सायनाने टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. ती म्हणाली की, प्रशंसा केल्याबद्दल धन्यवाद. कंगना चांगलीच आहे. पण मला माझ्या खेळात परिपूर्ण व्हायचे होते. मी अभिमानाने माझ्या देशासाठी बॅडमिंटनमध्ये अव्वल स्थान गाठले आणि ऑलिम्पिक पदक जिंकले. मी पुन्हा सांगेन की, घरी बसून बोलणे खूप सोपे आहे. नीरज चोप्रा आमचा सुपरस्टार आहे, त्याने या खेळाला प्रसिद्धी मिळवून दिली.
सायना काय म्हणाली होती?अलीकडेच एका मुलाखतीत सायनाने सांगितले की, जेव्हा नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकले तेव्हा मला भालाफेकबद्दल समजले. जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हाच तुम्ही पाहाल ना? जर तुम्ही पाहिलेच नाही तर कसे काय समजेल? मला भालाफेक प्रकाराबद्दल काहीच माहिती नव्हते. कारण की बरेच खेळ आहेत. मला खात्री आहे की लोकांना बॅडमिंटनबद्दल देखील माहिती नसेल. प्रकाश सर कोण हे मला माहीत नव्हते. ते कोण आहेत हे मला जाणून घ्यायचे नाही असे काही नव्हते. परंतु तुम्ही तुमच्या खेळात इतके व्यग्र असता की तुम्ही इतर कशासाठीही वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल सतत गुगल करावे लागते.