नवी दिल्ली : भारतीय खेळाडू व्यस्त वेळापत्रकाचा सातत्याने सामना करीत असल्याची कबुली देत राष्ट्रीय कोच पुलेला गोपीचंद यांनी व्यस्त वेळापत्रकाशी ताळमेळ साधण्याशिवाय खेळाडूंपुढे पर्याय नसल्याचे म्हटले आहे. भारतीय खेळाडू गरजेपेक्षा अधिक स्पर्धा खेळत असल्याचे विधान दिग्गज खेळाडू प्रकाश पदुकोण यांनी नुकतेच केले. त्यांच्या वक्तव्यानंतर देशात बॅडमिंटनपटूंच्या व्यस्त वेळापत्रकाचीच चर्चा सुरू झाली. एका कार्यक्रमात बोलताना गोपीचंद म्हणाले,‘व्यस्त वेळापत्रकाचा फटका केवळ भारतीय खेळाडूंनाच नव्हे तर जगातील खेळाडूंना बसतो आहे. महत्त्वपूर्ण असलेल्या आशियाई आणि राष्ट्रकुलसारख्या स्पर्धांमध्ये खेळणे गरजेचे असल्यामुळे भारतीय खेळाडूंसाठी पाठोपाठ स्पर्धा खेळणे ही मोठी डोकेदुखी ठरत आहे.’युरोपातील खेळाडू राष्ट्रकुल किंवा आशियाई खेळात खेळत नाहीत पण आमच्या खेळाडूंपुढे पर्याय नाही. आमच्या खेळाडूंना परिस्थितीशी ताळमेळ साधावाच लागेल. प्रवास करताना देखील सरावाकडे पाठ फिरवून चालणार नाही.’ भारताच्या अव्वल खेळाडूंना विश्रांती देत राष्ट्रकुलमध्ये दुय्यम दर्जाचा संघ पाठविणे योग्य राहील का, असा सवाल करताच गोपीचंद म्हणाले, ‘नाही. राष्ट्रकुल ही महत्त्वाची स्पर्धा असल्याने आम्हाला दुय्यम दर्जाचे खेळाडू पाठविता येणार नाही. पुढील सत्रात आमच्याकडे ठोस योजना असेल. आम्ही अधिकारी आणि खेळाडूंसोबत चर्चा करीत योजना आखणार आहोत. यामुळे काही खेळाडूंना विश्रांतीची संधी मिळू शकेल.’ यंदा दोन मोठ्या स्पर्धांमध्ये सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्याबद्दल विचारताच गोपीचंद यांनी आॅलिम्पिक रौप्य विजेत्या सिंधूबद्दल चिंता बाळगण्याचे कारण नाही, इतकेच सांगितले. (वृत्तसंस्था)सिंधू युवा आहे आणि तिने अनेक शानदार विजय नोंदविले आहेत. भविष्यातही ती आणखीदेखील कामगिरी बजावेल. मी तिच्या कामगिरीवर आनंदी आहे. ती सध्या केवळ २२ वर्षांची आहे. मी तिच्याकडून मोठ्या कामगिरीबद्दल आश्वस्त आहे. - गोपीचंद
बॅडमिंटन वेळापत्रक व्यस्त; पण पर्याय नाही : गोपीचंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:35 AM