लंडन : भारताचा विक्रमवीर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने जगभरातील गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. आता त्याचा मुलगा अर्जुननेही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मैदान गाजवण्यास प्रारंभ केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजपासून प्रारंभ झालेल्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला इंग्लंड संघ लॉर्डस्वर सराव करीत होता. या सराव सत्रात सहभागी झालेल्या अर्जुनच्या गोलंदाजीवर इंग्लंडचा एक मुरब्बी फलंदाज जखमी झाला. वेदनेने विव्हळत असलेल्या या खेळाडूला मैदानही सोडावे लागले. इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज असलेला जॉनी बेयरस्टॉ हे जखमी झालेल्या फलंदाजाचे नाव आहे. येथील एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या वर्षी इंग्लंडतर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा फटकावणारा जॉन बेयरस्टो अर्जुनच्या पहिल्याच चेंडूवर जायबंदी झाला. त्यामुळे त्याला सराव सोडावा लागला. अर्जुनने पहिलाच चेंडू यॉर्कर टाकला होता. हा चेंडू जॉनीच्या पायाच्या घोट्यावर आदळला. त्यामुळे जॉनी वेदनेने विव्हळत होता. वेदना सहन न झाल्यामुळे त्याने मैदान सोडले. दरम्यान, जॉनीची दुखापत गंभीर नव्हती. त्यामुळे गुरुवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रारंभ झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तो सहभागी झाला. दक्षिण आफ्रिका संघ इंग्लंडविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून लॉर्ड््सवर प्रारंभ झाला. सहा फूट उंची लाभलेल्या अर्जुनने इंग्लंडच्या लॉर्ड््स मैदानावर अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंना गोलंदाजी केली आहे. पाकिस्तानचे महान गोलंदाज वसीम अक्रम यांनी अर्जुनच्या गोलंदाजीची प्रशंसाही केली आहे. (वृत्तसंस्था)
अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीवर बेयरस्टॉ जखमी
By admin | Published: July 07, 2017 1:07 AM