लास वेगास : भारताचा उदयोन्मुख पैलवान बजरंगचे शनिवारी येथे जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक थोडक्यात हुकले. पुरुषांच्या ६१ किलो फ्री स्टाईल प्रकाराच्या कांस्यपदकाच्या प्ले आॅफ लढतीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला. त्याच्या या अपयशाबरोबरच भारताच्याही जागतिक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीत आणखी भर पडली.बजरंगशिवाय दोन अन्य भारतीय पुरुष पहिलवान नरेश कुमार (८६ किलो) आणि मौसम खत्री (९७ किलो) हेदेखील पदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेले. सरिताला क्वालिफिकेशन राऊंडमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यामुळे या स्पर्धेत महिला कुस्तीत भारताचे अभियान निराशाजनक रूपाने समाप्त झाले.अर्जुन पुरस्कारविजेता बजरंगची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्याला क्वालिफिकेशन राऊंडमध्येच मंगोलियाच्या बतबोल्द नोमिनविरुद्ध पराभव पत्करावा लागला. तथापि, मंगोलियाचा पैलवान फायनलमध्ये पोहोचला. त्याने रौप्यपदक जिंकले. त्यामुळे बजरंगला रेपेचेज राऊंडमध्ये खेळण्याची संधी मिळाली. बजरंगने रेपेचेजमध्ये आपल्या दोन्ही लढती जिंकताना कांस्यपदकासाठीच्या प्लेआॅफमध्ये स्थान मिळवले.रेपेचेजमध्ये बजरंगने प्रथम स्थानिक पैलवान रिसे वेस्ले हमफ्रे याचा ६-० आणि नंतर जॉर्जियाचा बेका लोमताद्जे याचा १३-६ असा पराभव केला; परंतु कांस्यपदकाच्या प्ले आॅफमध्ये बजरंगला युक्रेनच्या वासिल सुपतारकडून पराभव पत्करावा लागला. त्याचबरोबर तो कांस्यपदक मिळवण्यापासून वंचित राहिला.त्याआधी खत्रीला उपउपांत्यपूर्व फेरीत रशियाच्या अब्दुल सलाम गादिसोव्हविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला; परंतु गादिसोव्हने अंतिम फेरीत धडक मारल्यामुळे खत्रीला रेपेचेजमध्ये खेळण्याची संधी मिळाली. पण, खत्रीला जर्मनीच्या स्टीफन केहररविरुद्ध ५-६ असा पराभव पत्करावा लागला. नरेशही पहिला अडथळा पार करण्यात अपयशी ठरला. त्याला स्वित्झर्लंडच्या मार्लो लुकास रीसेनने एकतर्फी लढतीत १0-0 असे पराभूत केले.महिलांच्या ६0 किलो वजन गटात सरिताला क्वालिफाइंग राऊंडमध्ये हंगेरीच्या बार्का एम्सेविरुद्ध २-४ असा पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था)
जागतिक कुस्ती स्पर्धेत बजरंगचे कांस्यपदक हुकले
By admin | Published: September 13, 2015 4:10 AM