Bajrang Punia - ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या बजरंग पुनियाने शुक्रवारी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्यासाठी दोन पानी पत्र लिहिले. या पत्रात त्याने आपल्या मागण्या ऐकल्या जात नसल्याने पद्मश्री पुरस्कार परत करणार असल्याचे म्हटले आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून भारताचे स्टार कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघातील बृजभूषण शरण सिंग यांच्या मनमानी आणि हुकूमशाहीच्या विरोधात आंदोलन करत आहे. बृजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचाही आरोप आहे. यासाठी दिल्लीत बजरंग सह साक्षी मलिक, विनेश फोगाट हे स्टार कुस्तीपटूही आंदोलनात होते. आज बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार व पत्र पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या निवास स्थानाबाहेरील रस्त्यावर ठेवले. हा पुरस्कार घेऊन जाण्याची विनंती पोलिस त्याला करत होते, परंतु बजरंग त्याच्या निर्णयावर ठाम दिसला.
भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) निवडणुकीत भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगाट यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली होती. केंद्र सरकारने महिला कुस्तीपटूंच्या तक्रारींकडे लक्ष न दिल्याने भारताची ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक हिनेही काल निवृत्तीची घोषणा केली होती.
बजरंग पुनियाने पत्रात लिहिले आहे की, 'तुम्हाला माहिती असेल की यावर्षी जानेवारी महिन्यात देशातील महिला कुस्तीपटूंनी कुस्तीपटूंनी प्रभारी बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते . सरकारने ठोस कारवाई करण्याचे सांगितल्यावर आंदोलक पैलवान जानेवारीत आपापल्या घरी परतले. पण तीन महिने उलटूनही जेव्हा बृजभूषण विरोधात एफआयआर दाखल झाला नाही, तेव्हा एप्रिल महिन्यात आम्ही कुस्तीपटू पुन्हा रस्त्यावर उतरले. पण तरीही काही उपयोग झाला नाही. म्हणून आम्हाला कोर्टात जावे लागले आणि एफआयआर नोंदवावा लागला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी परवानगी घेणे गरजेचे असले, परंतु मी ते केले नाही. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे हा पुरस्कार व चिठ्ठी त्यांच्या निवास स्थानाबाहेर ठेवतोय, असे पुनियाने सांगितले.
पुनियाने पुढे लिहिले, 'आम्ही आमची पदके गंगेत टाकण्याचा विचार केला. तिथे गेल्यावर आमचे प्रशिक्षक आणि शेतकऱ्यांनी आम्हाला तसे करू दिले नाही. त्याचवेळी तुमच्या एका जबाबदार मंत्र्याचा फोन आला आणि आम्हाला परत या, आम्हाला न्याय दिला जाईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, आम्ही आमच्या गृहमंत्र्यांचीही भेट घेतली, ज्यामध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की ते महिला कुस्तीपटूंना न्याय मिळवून देण्यासाठी पाठिंबा देतील. त्यांचा सल्ला आम्ही मान्य करत रस्त्यावरून आमचे आंदोलन संपवले. मात्र, २१ डिसेंबर रोजी झालेल्या कुस्ती संघटनेच्या निवडणुकीत बृजभूषण यांचे निकटवर्तीय निवडून आले.
मला २०१९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच खेलरत्न आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित. हा सन्मान मिळाल्यावर मला खूप आनंद झाला. असे वाटत होते की जीवन यशस्वी झाले आहे. पण आज मी त्याहून अधिक दुःखी आहे आणि हे सन्मान मला दुखावत आहेत. एकच कारण आहे, ज्या कुस्तीसाठी आम्हाला हा मान मिळतो, आमच्या सहकारी महिला कुस्तीपटूंना त्यांच्या सुरक्षेसाठी कुस्ती सोडून द्यावी लागत आहे, असेही पुनियाने पुढे लिहिले.