गोल्डकोस्ट- राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू बजंरग पुनियानं ६५ किलो वजनीगटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. बजरंग पुनियानं वेल्सच्या केन चॅरिगचा १०-० असा धुव्वा उडवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तांत्रिक गुणांच्या जोरावर बजरंगनं प्रतिस्पर्ध्याला चीतपट केलं. बजरंगच्या या सोनेरी कामगिरीमुळे भारताला स्पर्धेतील सतरावं सुवर्णपक जिंकलं.
अंतिम फेरीत बजरंगनं प्रतिस्पर्धी केनला कोणतीही संधी दिली नाही. बजरंगचा खेळ इतका सफाईदार होता की, प्रतिस्पर्धी खेळाडूला गुणांचं खातंदेखील उघडता आलं नाही. बजरंगनं तांत्रिक गुणांच्या जोरावर १० मिनिटं चाललेल्या अंतिम सामन्यात पूर्णपणे वर्चस्व गाजवलं आणि भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिलं.
बजरंगचा सुवर्णपदकाचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्याला वडिलांकडून कुस्तीचा वारसा मिळाला आहे. बजरंगचे वडील बलवान पूनियाही कुस्तीपटू होते. पण घरच्या गरिबीच्या परिस्थितीमुळे त्यांचं करिअर पुढे जाऊ शकलं नाही. बजरंग कुस्तीची तयारी करत असताना त्यालाही अशाच परिस्थितीला सामोरं जावं लागलं. बजरंगच्या वडिलांकडे मुलाला तूप खायला घालण्यासाठी पैसे नसायचे. बजरंगच्या खाण्याचा खर्च भागवता यावा, यासाठी ते सायकलवरून प्रवास करायचे व बसने जाण्याचे पैसे वाचवायचे. बसच्या तिकिटाचे वाचवलेले पैसे ते बजरंगसाठी खाण्याच्या वस्तू खरेदी करण्यावर खर्च करायचे, अशा परिस्थितीचा सामना करत बजरंगने देशाचं नाव मोठं केलं आहे.
24 वर्षीय बजरंग पुनियाने दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममधून कुस्तीचं प्रशिक्षण घेतलं. हरियाणाच्या बजरंगने 2014 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये 61 किलो वजनीगटात रौप्यपदकाची कमाई केली.