हैदराबाद : पावसाच्या ‘खेळा’नंतर सुरू झालेल्या अत्यंत रोमहर्षक सामन्यात बाजी मारली ती विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने. गेलच्या १० चेंडंूत ३५ धावांच्या बरसातीनंतर विराट कोहलीने केलेल्या १९ चेंडूंतील ४४ धावांच्या चमत्कारी खेळीच्या जोरावर बंगळुरूने सनरायझर्सचा ६ गडी आणि एक चेंडू राखून पराभव केला. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार, बंगळुरूपुढे ६ षटकांत ८१ धावांचे नवीन लक्ष्य ठेवण्यात आले होते. हे आव्हान बंगळुरूने ५.५ षटकांत ४ गडी गमावून गाठले. या नव्या लक्ष्याचा पाठलाग करताना ख्रिस गेलने ३ षटकार आणि ४ चौकार ठोकून १० चेंडूंत ३५ धावांची झुंझार खेळी केली. तो बाद झाल्यानंतर डिव्हिलियर्स (०), मनदीपसिंग (१) व कार्तिक (२) हे झटपट बाद झाले. मात्र, एका बाजूने कर्णधार विराटने धावांचा सपाटा लावला. त्याने चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. दोन चेंडूंत ४ धावांची आवश्यकता असताना षटकार ठोकून त्याने विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी, सनरायझर्सचे मोईझिस हेन्रिक्स (५७) आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर (५२) यांच्या आक्रमक अर्धशतकांच्या बळावर सनरायझर्सने निर्धारित ११ षटकांत १३६ धावा केल्या होत्या. पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याला उशिरा सुरुवात झाली. रात्री ८ वाजताचा हा सामना १०.४५ वा. सुरू झाला. त्यामुळे डकवर्थ लुईसच्या नियमानुसार, ११ षटकांचा सामना खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याआधी, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन ८ धावांवर तंबूत परतल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि हेन्रिक्स या जोडीने बंगळुरूची गोलंदाजी फोडून काढली. चौकार आणि षटकारांची आतषबाजी करीत त्यांनी ३० चेंडूंत संघाचे अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या गड्यासाठी या जोडीने २५ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर ५० चेंडूंत त्यांनी १०० धावांची भागीदारी केली. यामध्ये हेन्रिक्सने अवघ्या २० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. यात त्याच्या ३ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी अवघ्या ४३ चेंडूंत शतकी भागीदारी केली. अखेर धावांची बरसात करणारा हेन्रिक्स वीसच्या चेंडूवर कार्तिकरवी झेलबाद झाला. त्याने अवघ्या २२ चेंडूंत ५७ धावा चोपल्या. तो बाद झाल्यानंतर वॉर्नरनेही अर्धशतक पूर्ण केले. मॉर्गनने ११ धावांचे योगदान दिले. वार्नरने ३२ चेंडूंत नाबाद ५२ धावांची खेळी केली. बंगळुरूकडून डेव्हिड वीसने सर्वाधिक २ गडी बाद केले. (वृत्तसंस्था)
बंगळुरूचा ‘विराट’ विजय!
By admin | Published: May 16, 2015 2:33 AM