नवी दिल्ली : बीसीसीआयने आयसीसीच्या बैठकीमध्ये प्रतिनिधी म्हणून एन. श्रीनिवासन यांना पाठविण्याचा निर्णय घेतला तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे आयसीसीचे प्रस्तावित घटनाबदल व आर्थिक सुधारणा विधेयक रोखण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसणार आहे.बीसीसीआयच्या विशेष आमसभेमध्ये जास्तीत जास्त राज्य संघटना श्रीनिवासन यांचे समर्थन करणार असल्याचे संकेत मिळत आहे. बीसीसीआयची विशेष आमसभा ९ एप्रिल रोजी होणार आहे. याचा अर्थ बांगलादेश आणि श्रीलंका भारताचे समर्थन करणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्राने सांगितले की,‘बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) श्रीनिवासन यांच्यापासून सावध आहेत. आॅस्ट्रेलियातील २०१५ च्या विश्वकप स्पर्धेत आयसीसी अध्यक्ष मुस्तफा कमाल यांचा झालेला अपमान ते अद्याप विसरलेले नाहीत. त्यामुळे आयसीसी बोर्डाच्या बैठकीमध्ये श्रीनिवासन बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करणार असतील तर बांगलादेशची बीसीसीआयला साथ लाभणार नाही.’दरम्यान, श्रीलंकासुद्धा असाच विचार करीत असून झिम्बाब्वेचेही असेच मत आहे. भारताला आयसीसीमधील सुधारणा रोखण्यासाठी तीन मतांची गरज आहे. सूत्रानी सांगितले की,‘सुधारणाबाबतचा प्रस्ताव मतदानासाठी आला आणि श्रीनिवासन यांनी बीसीसीआयचे प्रतिनिधित्व केले तर बीसीसीआयला १-९ किंवा २-८ ने पराभव स्वीकारावा लागला तर आश्चर्य वाटायला नको.’आयसीसीच्या गेल्या दोन बैठकांमध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधित्व विक्रम लिमाये यांनी केले होते. आयसीसीची वार्षिक बैठक २७-२८ एप्रिल रोजी दुबईमध्ये होणार आहे. (वृत्तसंस्था)
...तर बांगलादेश, श्रीलंकेचा भारताला पाठिंबा नसेल
By admin | Published: April 03, 2017 12:32 AM